2024ची निवडणूक एकाच इंजिनवर; युतीच्या चर्चेला फडणवीसांकडून पूर्णविराम

पुणे – मेट्रोला एकच इंजिन असते. त्याला डबल इंजिनची आवश्यकताच नसते. यामुळे 2024 च्या निवडणुकीत आम्ही एकाच इंजिनवरच येणार आहोत, असे म्हणत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी युतीची शक्यता नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे युतीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी फडणवीस यांनी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी सवांदही साधला आहे. देशाला पुढे नेण्यासाठी चांगल्या कंडक्ट्ररची गरज आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. याबाबत फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, हा उद्धव ठाकरे यांचा प्रस्ताव, टिप्पणी का कमेंट आहे हे बघावे लागणार आहे.
उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पक्षाने कशा शुभेच्छा द्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. परंपरेने नेतृत्व पुढे येत असेल तर त्यांनी अनुभव घेतला पाहिजे, असे मतही फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
काही दिवसांपासून दिल्लीत भेटीगाठीचे सत्र सुरू झाल्याने राज्यातील राजकारणात भाजप-शिवसेनेची पुन्हा युती होणार का याबाबत चर्चा रंगू लागली होती. तसेच, भाजप व मनसेच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, 2024 च्या निवडणुकीत आमचे एकच इंजिन असणार असल्याचे सांगत त्यांनी कोणाशीही युती होणार नसल्याचे अधोरेखित केले आहे.
शहाण्या माणसाने पुण्यात कमी बोलावे असे काहींनी सांगितले असल्याचे म्हणत फडणवीस यांनी अधिक राजकीय भाष्य करण्याचे टाळले आहे.



