2021 : टी20 मध्ये ‘या‘ पाच गोलंदाजांनी घेतले सर्वाधिक बळी

यंदाच्या आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट हंगामाचा शेवट अमेरिका विरुद्ध आयर्लंड यांच्यातील सामन्याने 24 डिसेंबरला झाला. टी20 विश्वचषकाचे वर्ष असल्याने सर्वच संघांनी 2021 मध्ये जास्तीत जास्त टी20 क्रिकेट खेळण्यावर भर दिला होता.
फलंदाजांचा खेळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या टी20 क्रिकेटमध्ये नेहमीप्रमाणे फलंदाजांचेच वर्चस्व राहिले. मात्र, यावेळी काही गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत फलंदाजांची अनेकवेळा भंबेरी उडवलेलीही पहायला मिळाले. या लेखातून आपण 2021 मध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेल्या 5 गोलंदाजांविषयी जाणून घेणार आहोत.
1. वानिंदू हसरंगा, श्रीलंका (36 बळी)
यंदा टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेला क्रिकेटपटू म्हणजे श्रीलंकेचा लेग-स्पिनर वानिंदू हसरंगा. आपल्या फिरकीतील कौशल्याने हसरंगाने अनेकांकडून वाहवा मिळवली.
हसरंगाने 2021 मध्ये केवळ 20 टी-20 सामन्यांमध्ये 36 फलंदाजांची शिकार केली. त्याचबरोबर नुकत्याच पार पडलेल्या टी20 विश्वचषकात हॅट्रिकसह सर्वाधिक बळी मिळवणार्या गोलंदाजांमध्येही तो अव्वल स्थानी होता.
2. तबरेझ शम्सी, दक्षिण आफ्रिका – (36 बळी)
टी20 क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी तबरेझ शम्सी हा या वर्षातील सर्वात यशस्वी गोलंदाज होता. या डावखुर्या फिरकीपटूने 22 सामन्यांमध्ये 36 बळी आपल्या खात्यात जमा केले. श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगाप्रमाणे शम्सीनेही सर्वाधिक 36 बळी मिळवले असले तरी हसरंगा पेक्षा दोन सामने जास्त खेळल्यामुळे या यादीत शम्सी दुसर्या स्थानावर आहे.
शम्सीने यंदा क्रिकेटच्या या सर्वात लहान प्रकारात दोन वेळा एका सामन्यात चार बळी घेतले. त्याची सर्वोत्तम गोलंदाजी 4/25 अशी होती, तर गोलंदाजीची सरासरी 13.36 होती.
3. दिनेश नाकराणी, युगांडा (35 बळी)
भारतात जन्मलेला डावखुरा मध्यमगती गोलंदाज दिनेश नाकराणी याच्यासाठी टी20 क्रिकेटमध्ये 2021 हे वर्ष सर्वात यशस्वी ठरले. त्याने 21 सामन्यांमध्ये 35 बळी मिळवले. तसेच या 30 वर्षीय खेळाडूने टी20 मध्ये कॅलेंडर वर्षात संघाच्या विजयात सर्वाधिक 30 फलंदाजांना बाद कण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
याचबरोबर नाकराणीने आतंरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एक सामन्यात सर्वाधिक बळी घेण्याच्या दीपक चहरच्या विक्रमाचीही बरोबरी केली. त्याने या वर्षाच्या सुरुवातीला लेसोथोविरुद्ध अवघ्या 7 धावा देत 6 फलंदाजांची शिकार केली होती.
4. वसीम अब्बास, माल्टा (29 बळी)
2021 मध्ये जगभरात अनेक नव्या संघांना आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. यात माल्टा या क्रिकेटमधील नवख्या देशाकडून खेळताना वसीम अब्बासने यावर्षी 18 सामन्यांमध्ये 29 बळी मिळवले. यामध्ये वसीमने एक सामन्यात 5 फलंदाज बाद करण्याचाही विक्रम आपल्या नावे केला. पोर्तुगालविरुद्धच्या सामन्यात त्याने 37 धावा देत 5 बळी मिळवले होते.
5. मुस्तफिझूर रहमान, बांगलादेश (28 बळी)
बांगलादेश क्रिकेट संघासाठी 2021 हे ऐतिहासिक वर्ष ठरले. गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जम बसवण्याचा प्रयत्न करणार्या बांग्लादेशने 2021 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यासारख्या दिग्गज संघांच्या विरुद्ध त्यांची पहिली टी20 मालिका जिंकली. आणि यामध्ये डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमानचा सिंहाचा वाटा होता.
मुस्तफिजुर रहमानने यंदा बांग्लादेशसाठी 20 सामने खेळताना 28 बळी मिळवले. यामध्ये एका सामन्यात 12 धावांवर 4 बळी अशी त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली.





