पाणी वाया घालवणाऱ्यांना २ हजार रूपये दंड!

नवी दिल्ली – प्रचंड उष्णतेमुळे हैराण झालेल्या दिल्लीकरांना आता पाणी टंचाईचाही सामना करावा लागतो आहे. त्यावर मात करण्यासाठी दिल्लीतील आम आदमी पार्टीचे सरकारही सरसावले आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सरकारने कडक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्यासंदर्भात दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी जलबोर्डाच्या सीईओंना पत्र लिहिले आहे.
पत्रात त्यांनी त्वरीत २०० पथके तैनात करण्याचे निर्देश देतानाच पाइपने कार धुणे, पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो होणे, बांधकाम आणि व्यावसायिक कामांसाठी पिण्यासाठी असलेल्या पाण्याचा वापर होत असेल त्यावर लगाम घालण्यास सांगितले आहे.
उद्या म्हणजे ३० तारखेला सकाळी आठ वाजल्यापासून पथके तैनात केली जाणार आहेत. पाण्याची नासाडी करताना जर कोणी व्यक्ती आढळला तर त्याला २ हजार रूपये दंड ठोठावला जाणार आहे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी किंवा अन्यत्र कुठे जर अवैध कनेक्शन आढळले तर तेही ताबडतोब तोडून टाकले जाणार आहे.
पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी दंडाची तरतूद असलेले नियम आणले जातील असे संकेत कालच आतिशी यांनी दिले होते. तसेच हरियाणा हे शेजारचे राज्य १ मेपासून दिल्लीला आपल्या वाट्याचे पाणी देत नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता.





