पुणे : सांडपाणी प्रक्रिया योजनेचे होणार ऑडिट

तब्बल 394 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे काम निकृष्ट ः समाविष्ट गावांतून तक्रारी
“सीओईपी’ची टीम करणार तपासणी
उत्तमनगर, शिवणे, धायरीतील कामांवर आक्षेप
पुणे – महापालिकेत 2017 मध्ये समाविष्ट झालेल्या 11 गावांमधील सांडपाण्याचे 100 टक्के संकलन करून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून तब्बल 392 कोटींच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. मात्र, हे काम निकृष्ट असल्याच्या तक्रारी येत आहेत. या दर्जाबाबत विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित झाल्याने महापालिकेकडून या कामाचे ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
समाविष्ट झालेल्या 11 गावांमध्ये 2021 मध्ये सांडपाणी व्यवस्थापनासाठीचे काम सुरू केले आहे. या कामासाठी 2025 पर्यंतची मुदत असून ही गावे 100 टक्के ड्रेनेजद्वारे जोडण्यात येणार आहेत. त्यासाठी जवळपास 100 किलोमीटरच्या मुख्य वाहिन्या, तर 450 किलोमीटरच्या उप सांडपाणी वाहिन्या असतील.
तीन ठिकाणी सांडपाणी शुद्धीकरण केंद्र असणार आहेत. या योजने अंतर्गत सध्या सर्व गावांमधे सांडपाणी वाहिन्या टाकल्या जात आहेत.मात्र, अनेक भागात ठेकेदारांकडून केलेले काम निकृष्ट असल्याच्या तक्रारी येत आहेत.
त्यामुळे आता प्रशासनाने पहिल्या टप्प्प्यात 3 गावांमधील कामांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला असला, तरी ही कामे निकृष्ट स्वरूपाची असल्याचे आढळल्यास इतर गावांची तपासणी केली जाणार असून त्याचा परिणाम प्रकल्प पूर्ण होण्याच्या मुदतीवर होण्याची शक्यता आहे.
प्रकल्पाला दोन वर्षे झालाय उशीर
करोनामुळे आधीच हा प्रकल्प दोन वर्षे रेंगाळला होता. त्यानंतर शासनाने या गावांमधील उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे वगळयाबाबत वारंवार निर्णय बदलण्यात आल्याने महापालिकेने या भागात काम थांबवल्याने प्रकल्पास आधीच उशीर झालेला आहे.
दरम्यान, अहवाल प्राप्त झाल्यानंतर काम योग्य दर्जाचे झालेले नसल्यास सर्व गावांमधील कामांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती मनपा अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली. याबाबत मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश दिलल्याचे डॉ. खेमनार यांनी स्पष्ट केले.
खडकवासला विधानसभा मतदारसंघातील या योजनेची कामे निकृष्ट झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून उत्तमनगर, शिवणे तसेच धायरी गावांतील या सांडपाणी वाहिन्यांच्या कामाची तपासणी केली जाणार आहे. याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर उर्वरीत कामाबाबत निर्णय घेतला जाईल.
– डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, मनपा





