nagar | मेंढपाळांची व्यापार्यांकडून १८ लाखांची फसवणूक

नगर, (प्रतिनिधी) – राहता तालुक्यातील मेंढपाळांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यावर कडक कारवाई करावी व त्यांच्याकडून मेंढपाळांची रक्कम परत मिळवून द्यावी, अन्यथा ७ जून रोजी राहता येथे धनगर समाज बांधव रस्त्यावर मेंढ्या सोडून रास्ता रोको आंदोलन करतील असा इशारा जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहुजी शेवाळे यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, व जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी जय मल्हार सेनेचे प्रमुख प्रदीपराज भोंडे, दिलीप सातव, नगर उत्तर जिल्हाध्यक्ष ॲड. सोमनाथ गांगले, जिल्हा प्रमुख आसाराम कर्डिले, गणेश खंबरे, काशिनाथ आरगडे, एकनाथ साबळे, ज्ञानदेव कांदळकर, राहुल राऊत, माणिक कर्डिले, सुदाम साबळे, सागर बनसोड, अरुण कर्डिले, दत्ता विर व मेंढपाळ उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, राहता तालुक्यातील मेंढपाळ सुनील साधू राऊत, राहणार केलवड यांच्या १८ मेंढ्या (किंमत १ लाख ६२ हजार रुपये), भाऊसाहेब सुखदेव साबळे, राहणार मनोली, तालुका संगमनेर यांच्या १६ मेंढ्या किंमत १ लाख ४८ हजार रुपये), एकनाथ महादू साबळे, राहणार मनोली, तालुका संगमनेर यांच्या २० मेंढ्या किंमत (१ लाख ८२ हजार रुपये), राहुल गबाजी राऊत,
राहणार केलवड तालुका राहता यांच्या १७ मेंढ्या (किंमत १ लाख ५३ हजार रुपये) आदीसह एकूण १७ लाख ८९ हजार २०० रुपयांचे पशुधन सलमान हसन शेख, हसन शेख, गुड्डू हसन शेख व पप्पू हसन शेख या चौघांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये विकत घेतले होते.
मेंढ्यांचे ठरलेले पैसे, मेंढ्या घेतल्यापासून १७ दिवसात मेंढपाळांना देण्याचे ठरले होते. मात्र आज देतो, उद्या देतो असे करीत करीत २ महिने उलटून गेले तरीही संबंधित व्यापाऱ्यांनी मेंढपाळांना त्यांचे पैसे परत दिले नाहीत.
मात्र २१ मे रोजी हसन शेख, सलमान शेख व इतरांकडे मेंढपाळ पैसे मागण्यासाठी गेले असताना सलमान गुड्डू व पप्पू हसन शेख येथे राहत नाहीत आणि मी पैसे देऊ शकत नाही, असे उत्तर हसन शेख यांनी दिले.
त्यामुळे रानावनात भटकंती करून, मेंढी पालन करणाऱ्या गरीब मेंढपाळांचे उत्पन्नच हसन शेख व इतरांनी हिरावून घेतल्यामुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. संबंधितांनी मेंढपाळांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.





