दुबईतील भीषण आगीत ४ भारतीयांसह १६जणांचा दुर्दैवी मृत्यू; तामिळनाडू सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत

अल रास : दुबईतील एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीत 4 भारतीयांसह 16 जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाकिस्तानचे 3 नागरिक आणि नायजेरियातील एका महिलेचाही समावेश आहे. या आगीत 9 जण गंभीर जखमी झाले आहेत.
स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, आगीची घटना रविवार घडली असून ज्या पाच मजली इमारतीला आग लागली ती दुबईच्या अल रास भागात आहे. आग पहिल्यांदा इमारतीच्या चौथ्या मजल्यावर लागली आणि हळूहळू दुसऱ्या-तिसऱ्या मजल्यावरही पसरली. दुबई पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आगीची माहिती मिळताच दुबई नागरी संरक्षण मुख्यालयाचे पथक घटनास्थळी पोहोचले. तातडीने इमारतीतील लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र काही वेळाने चौथ्या मजल्यावर असलेल्या लोकांचा मृत्यू झाला. एकूण 16 मृतदेह इमारतीतून बाहेर काढण्यात आले.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या 9 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत भारतीयांमध्ये केरळमधील एका जोडप्याचाही समावेश आहे. दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाने या अपघातात 4 भारतीयांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. भारतीय दूतावासातील दूत बिजेंदर सिंग यांनी, रिजेश कलंगदान , त्यांची पत्नी जेशी कलंगदान , गुडू सलियाकुंडू आणि इमामकासिम अब्दुल खादर अशी मृत भारतीयांची नावे असल्याचे म्हटले आहे.
मृतांपैकी दोन भारतीय तामिळनाडूचे रहिवासी होते. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रिजेश कलंगदान एका पर्यटन कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होता. दरम्यान तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी दुबईतील आगीत मृत्युमुखी पडलेल्या तामिळनाडूतील दोघांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.





