China Floods : चीनमधील पूर, भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, तर ३३ जण बेपत्ता
China Floods – चीनमध्ये गेल्या ४८ तासात झालेला मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामध्ये किमान १७ जणांचा मृत्यू झाला असून अन्य ३३ जण बेपत्ता झाले आहेत. शोध आणि बचावकार्य पुर्ण क्षमतेने राबवण्याचे, तसेच पूर नियंत्रण आणि आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचे निर्देश अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिले आहेत. वायव्येकडील गान्सू प्रांतात मुशधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले आहे.
त्यात किमान १० जणांचा मृत्यू झाला तर अन्य ३३ जण बेपत्ता झाले असल्याचे शिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेच्या बातमीमध्ये म्हटले आहे. चीनच्या दक्षिणेकडील गुआंडोंग प्रांताची राजधानी असलेल्या गुआंझाऊ शहरातल्या एका अन्य घटनेमध्ये ७ जणांचा मृत्यू झाला आणि अन्य ७ जण जखमी झाले आहेत, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
गुआंझाऊ प्रांतातल्या बाइयून जिल्ह्यातल्या डायूआन गावामध्ये देखील दरडी कोसळल्या आहेत. यामुळे अनेक लोक गाडले गेले आहेत आणि काही घरांचेही नुकसान झाले आहे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन ब्युरोने म्हटले आहे. घटनास्थळावरील मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले असून जखमींना रुग्णालयात पोचवण्यात आले आहे.
परिसरातील भूस्तरिय आपत्तीची शक्यता पडताळली जाते आहे. लान्झौ शहर आणि आजूबाजूच्या परिसरात गुरुवारी रात्री २२० मिली मीटर इतक्या पावसाची नोंद झाली. युझोंग जवळच्या काही गावांमध्ये पुरामुळे स्थिती गंभीर बनली आहे. या भागातील काही घरे आणि वाहनांचेही पावसामुळे नुकसान झाले आहे.
मदत आणि बचावकार्यासाठी २,७०० कर्मचाऱ्यांना घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. पुरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. बीजिंगसह चीनमधील काही प्रांतातांमध्ये अलिकडच्या काळात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. आठवड्याभरापुर्वी पअतिवृष्टीशी संबंधित घटनांमध्ये ४४ लोकांचा मृत्यू झाला होता.





