Indonesia News : इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर पुराचे १६ बळी तर ६ जण बेपत्ता; अद्यापही मदतकार्य सुरूच !

कारो, (इंडोनेशिया) – इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर अतिवृष्टीमुळे आलेला पूर आणि दरडी कोसळल्यामुळे किमान १६ जण ठार झाले आहेत. डोंगरांच्या पायथ्यांशी असलेल्या अनेक गावांवर मातीचे ढिगारे कोसळले असून अनेक जण गाडले गेले आहेत. बचाव आणि शोध पथकाला आतापर्यंत १६ जणांचे मृतदेह सापडले आहेत. अजूनही ६ जण बेपत्ता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गेल्या आठवड्यापासून या बेटावर संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले आहे. उत्तर सुमात्रा प्रांतातल्या चार जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आले आहेत. या पुरात अनेक घरे आणि शेतजमीन देखील वाहून गेली आहे. अचानक आलेल्या पुरामुळे डझनभर लोक जखमी झाले आहेत. या पुरात १३० हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन आणि शेतपिकांचे नुकसान झाले आहे.
पोलीस, सैन्यदल आणि अन्य बचाव पथकांनी मदतकार्य सुरू केले आहे. मात्र चखलाचे मोठे थर हटवून गाडले गेलेल्यांना शोधण्याचे मोठे आव्हान बचाव पथकापुढे आहे. साधारण ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत होणाऱ्या मोसमी पावसामुळे इंडोनेशियामध्ये वारंवार पूर आणि भूस्खलन होते.





