Devendra Fadnavis : “सौर ऊर्जेच्या माध्यमातून वर्षअखेरपर्यंत १६ गिगावॅट वीज निर्मिती” – मुख्यमंत्री फडणवीस
या वर्षाच्या अखेरपर्यंत १६ गिगावॅट वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून उपलब्ध होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Devendra Fadnavis – महाराष्ट्राने आशियातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून यशोगाथा रचली आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत १६ गिगावॅट वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून उपलब्ध होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने इंडिया पॅव्हेलियनमध्ये इंटरनॅशनल सोलर अलायन्सच्या वतीने आयोजित स्केलिंग सोलर एनर्जी व्हेअर इट मॅटर या विषयावर फडणवीस यांनी मांडणी केली.
यावेळी रूफटॉप सोलर, सौर पंप, अब्जावधींची वीजखर्च बचत, कार्बन उत्सर्जनात मोठी घट, तसेच सौरऊर्जा, बॅटरी स्टोरेज आणि पंप स्टोरेजद्वारे भविष्यात राज्य व राष्ट्रीय वीज ग्रीड स्थिर करण्याच्या योजनांची त्यांनी माहिती दिली.
फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राने दशकापेक्षा कमी काळात संपूर्ण ऊर्जा क्षेत्राचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. राज्यातील वीज ग्राहकांमध्ये १० टक्के हे कृषि पंपधारक आहेत, जे एकूण विजेच्या ३०% वीज वापरत होते.
त्यांना वीज पुरवठा करण्याचा खर्च प्रति युनिट ८ रुपये होता, तर त्यांच्याकडून फक्त १ रुपया आकारला जात असे. उर्वरित ७ रुपये राज्याकडून किंवा क्रॉस सबसिडीच्या स्वरूपात दिले जात होते, ज्यामुळे औद्योगिक आणि इतर ग्राहकांसाठीच्या विजेच्या दराचा भार वाढत होता.
आम्ही शेतीचा संपूर्ण वीज भार सौर ऊर्जेवर हलवण्याचा निर्णय घेतला. आशियातील सर्वात मोठी विकेंद्रित सौर ऊर्जा योजना सुरू केली. याद्वारे प्रत्येक कृषी फिडर स्वतंत्रपणे सौरऊर्जेवर आणला गेला.
शेतकऱ्यांना वीज पुरवण्यासाठी आम्ही स्वतंत्र कंपनी स्थापन केली. आता या वितरण प्रणालीद्वारे सुमारे १६ गिगावॅट वीज निर्माण केली जाईल आणि या वर्षाच्या अखेरीस आम्ही हा प्रकल्प पूर्ण करू. आम्ही दरमहा सुमारे ५०० मेगावॅट समर्पित करत आहोत आणि लवकरच १ गिगावॅट वीज निर्मिती पर्यंत पोहोचणार आहेत.
या दरम्यान, शेतकऱ्यांना वीज पुरवठ्याचा जो खर्च ८ रुपये होता, तो आता ३ रुपयांपेक्षा कमी झाला आहे. यामुळे उद्योग आणि घरगुती ग्राहकांवरील खर्चाचा बोजा कमी झाला.
राज्यात पीएम सूर्य घर योजना उत्तमरित्या राबविली जात आहे. यातून सुमारे ४ गिगावॅट क्षमतेचे रूफटॉप सोलर संयत्र कार्यान्वित होणार आहे. यामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी होऊ लागले आहे.
आम्ही आता केंद्र कृषि पंपाच्या नवीन जोडण्यांसाठी केंद्र सरकारच्या योजनेच्या धर्तीवर मागेल त्याला सौर पंप योजना सुरू केली. यात संपूर्ण भारतात जेवढे सौर पंप बसवले आहेत, त्यापैकी ६०% महाराष्ट्रात असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.





