Pradeep Purnekar case : 150 कॉल्स अन् महिनाभराचे प्लॅनिंग! प्रदीप पूर्णेकर प्रकरणात धक्कादायक माहिती उघड; आता तपासाला वेग येणार
Pradeep Purnekar case : आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात एकूण पाच आरोपींचा सहभाग असल्याचे तपासात निषप्न झाले आहे.

Pradeep Purnekar case : ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाला एक आठवडा पूर्ण झाला आहे. या हत्याकांडाने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा मास्टरमाईंड नेमका कोण? याचा उलघडा होणे बाकी आहे. सध्या पोलिसांकडून वेगवेगळ्या अँगलने तपास सुरू आहे.
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात एकूण पाच आरोपींचा सहभाग असल्याचे तपासात निषप्न झाले आहे. त्यापैकी तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे. यापैकी पप्या शिंदे याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिस तपासात या प्रकरणासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पप्या शिंदे याने आरोपींशी तब्बल १५० वेळा संवाद साधल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा कट अचानक रचला नसून, गेल्या काही दिवसांपासून त्याचे प्लॅनिंग सुरू होते.
पप्या शिंदेची महत्वाची भूमिका
तपासात पप्या शिंदे याची भूमिका महत्त्वाची असल्याचे समोर येत आहे. पूर्णेकर यांच्या हत्येनंतर आरोपींना गोव्याला पळून जाण्यासाठी त्याने कारची व्यवस्था केल्याची माहिती मिळाली आहे. तसेच, हत्येच्या कटासाठी त्याने तीन दुचाकी आणि एका कारची व्यवस्था केल्याचेही तपासात समोर आले आहे. दुसरीकडे, टल्ली याने एका बाईकची व्यवस्था केल्याची माहिती आहे.
दोन आरोपी अद्याप फरार
या प्रकरणातील संतोष कनोजिया हा महत्त्वाचा दुवा ठरण्याची शक्यता असून तो सध्या फरार आहे. तो दुसऱ्या राज्यात किंवा देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. टल्लीविरोधातही पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली आहे. या दोघांना अटक झाल्यानंतर हत्याकांडामागील आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
हॅाटेल महाराजा महत्वाची कडी?
पोलिस तपासात पवारनगर परिसरातील हॉटेल महाराजा येथे आरोपींच्या बैठका झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार पोलिसांनी संबंधित हॉटेलमध्ये चौकशी करून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्याआधारे तपासाला वेग देण्यात आला आहे. दरम्यान, २९ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास पप्या शिंदे हा प्रदीप पूर्णेकर यांच्या कार्यालयात बसला होता. याच वेळी त्याने मारेकऱ्यांना इशारा केल्यानंतर आरोपी कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी गोळीबार तसेच कोयत्याने वार करून पूर्णेकर यांची हत्या केल्याचा आरोप आहे.
नवे धागेदोरे समोर येणार?
पप्या शिंदे वापरत असलेला मोबाइल क्रमांक दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असल्याचेही पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे कॉल रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपींच्या हालचालींच्या आधारे पोलिसांकडून या संपूर्ण हत्याकांडाचा उलगडा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता फरार आरोपींच्या अटकेनंतर या प्रकरणात आणखी कोणते नवे धागेदोरे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Sohla Movie Trailer : सोनाली बेंद्रेचे मराठी सिनेमात पदार्पण; चाहत्यांमध्ये उत्सुकता






