अमृतसरध्ये विषारी दारू पिऊन १४ जणांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?

अमृतसर : पंजाबमधील अमृतसरमधील अनेक गावांमध्ये विषारी दारू प्यायल्याने १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. थरयवाल, मार्डी आणि भांगाली या गावांमध्ये विषारी दारू पिल्याने अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. पंजाब सरकारने या प्रकरणात मोठी कारवाई करत मुख्य आरोपी प्रभजीत सिंगला अटक केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रभजीत सिंग हा बनावट दारू पुरवण्यामागील सूत्रधार आहे. एसएसपी अमृतसर ग्रामीण यांनी पुष्टी केली आहे की उत्पादन शुल्क कायद्याच्या कलम १०५ बीएनएस आणि ६१अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये कुलबीर सिंग उर्फ जग्गू (मुख्य आरोपी प्रभजीतचा भाऊ), साहिब सिंग उर्फ सराई, गुरजत सिंग आणि निंदर कौर यांचा समावेश आहे.
पोलिस संपूर्ण बनावट दारू नेटवर्कचा तपास करत आहेत. यासोबतच पंजाब सरकारकडून या प्रकरणात कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
या संदर्भात बोलताना अमृतसरच्या उपायुक्त साक्षी साहनी म्हणाल्या, ही पंजाबमधील मजिठा येथील घटना आहे. येथे काही लोकांनी विषारी दारू प्यायली होती आणि रात्रीच आम्हाला ५ गावांमधून लोकांची तब्येत बिघडल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता आम्ही ताबडतोब वैद्यकीय पथकाला बोलावले असून घरोघरी जाऊन चौकशी करत आहे. या घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला आहे आणि सरकार पूर्ण मदत करत आहे.
पुढे बोलताना म्हणाल्या, “ही दारू जिथून नेण्यात आली होती, वितरक किंवा पुरवठा करणाऱ्या सर्वांना अटक करण्यात आली आहे आणि त्याचा उर्वरित शोध सुरू आहे. याशिवाय, वसुली देखील केली जात आहे. यासोबतच, गावातील लोकांना वैद्यकीय मदत दिली जात आहे, असं अमृतसरच्या उपायुक्त साक्षी साहनी म्हणाल्या.





