चंदीगढ : पंजाब पोलिसांनी बीएसएफच्या मदतीने फाजिल्का जिल्ह्यातील एका सीमा चौकीजवळ सीमेपलीकडील तस्करीचा एक मोठा प्रयत्न हाणून पाडला आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा आणि अंमली पदार्थ जप्त केले आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी दिली. कडाक्याची थंडी आणि दाट धुक्याचा फायदा घेऊन भारतीय सीमेत घुसखोरी करणा-या पाकिस्तानी तस्करांचे मनसुबे सीमा सुरक्षा दलाने मातीस मिळवले आहेत. पंजाबच्या फाजिल्का आणि अमृतसर सीमेवर राबवलेल्या मोहिमेत सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा आणि कोट्यवधी रुपये किमतीचे हेरॉईन जप्त केले आहे. या कारवाईदरम्यान एका घुसखोराला कंठस्रान घालण्यात यश आले आहे. फाजिल्का जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवरील बीओपी जी-जी-३ परिसरात गुरुवारी मध्यरात्री पाकिस्तानी तस्करांच्या हालचाली दिसल्या. हे तस्कर दोन मोठ्या बॅगांमधून शस्त्रे आणि ड्रग्जची खेप भारतात पाठवण्याच्या तयारीत होते. सतर्क बीएसएफ जवानांनी त्यांना पाहताच जोरदार गोळीबार सुरू केला. जवानांनी तब्बल ६० राउंड फायरिंग केल्यामुळे तस्कर घाबरून अंधाराचा फायदा घेत पुन्हा पाकिस्तानच्या दिशेने पळून गेले. सर्च ऑपरेशनमध्ये जवानांच्या हाती परदेशी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा लागला आहे. यामध्ये ११ ग्लॉक, ५ जिगाना, ३ नॉरिंको आणि १ बरेटा अशा एकूण २० पिस्तुल आहेत. ३९ मॅगझिन, १ गन आणि ३१० जिवंत काडतुसे देखील जप्त करण्यात आली आहेत. तसेच २ किलो १६० ग्रॅम हेरॉईन ताब्यात घेण्यात आले आहे.