अमेरिकेतून परत पाठवलेल्या भारतीयांमध्ये महाराष्ट्राचे किती? सर्वात जास्त गुजरात-हरियाणाचे

चंदीगड/अमृतसर – अमेरिकेतील 104 अनिवासी भारतीयांना घेऊन अमेरिकेचे लष्करी विमान C-17 बुधवारी अमृतसरमधील श्री गुरु रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले आहे. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच अमेरिकेने इतक्या मोठ्या संख्येने भारतीयांना परत पाठवले आहे. हे लोक बुधवारी दुपारी अमेरिकन लष्करी विमान C-17 मध्ये अमृतसर विमानतळावर पोहोचले. यापैकी 30 लोक पंजाबचे रहिवासी आहेत. अमेरिकेतून परतलेल्या 104 भारतीयांमध्ये 72 पुरुष, 19 महिला आणि 13 मुलांचा समावेश आहे.
कोणत्या राज्यातील किती लोक आहेत?
अमेरिकेतून परत पाठवलेल्या एकूण 104 भारतीयांपैकी 33 गुजरात, 33 हरियाणाचे नागरिक आहेत, तर 30 पंजाबचे आहेत. याशिवाय 2 नागरिक चंदीगड येथील आहेत. महाराष्ट्राचे 3 तर उत्तर प्रदेशचे 3 रहिवासी आहेत.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी अनिवासी परतले –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी अनिवासी भारतीयांना भारतात परत पाठवण्यात आले आहे. मोदी दोन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जात असून, तिथे ते ट्रम्प यांची भेट घेणार आहेत आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. 12 फेब्रुवारीला ते अमेरिकेला जाणार असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.
नुकतेच मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवर चर्चा झाली होती. यामध्ये त्यांनी जगातील शांतता आणि सुरक्षितता तसेच अवैध स्थलांतराच्या मुद्द्यावर चर्चा केली. या चर्चेबाबत ट्रम्प म्हणाले की, स्थलांतराच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींसोबत चर्चा झाली. बेकायदेशीर स्थलांतरितांना परत घेण्यासाठी भारत योग्य पावले उचलेल. बेकायदेशीरपणे अमेरिकेत घुसलेल्या स्थलांतरितांना परत घेऊन या समस्येचा सामना करण्यासाठी भारत सहकार्य करेल, असे आश्वासन भारताने अमेरिकेला दिले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका स्पष्ट –
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की, आम्ही बेकायदेशीर स्थलांतराच्या विरोधात आहोत. योग्य कागदपत्रांशिवाय कोणताही भारतीय जगात कुठेही राहत असेल तर आम्ही त्याला परत घेऊ.
400 टक्के वाढ –
यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एनफोर्समेंट 2024 च्या वार्षिक अहवालानुसार, गेल्या तीन वर्षांत यूएसमधून भारतीय नागरिकांच्या हद्दपारीच्या संख्येत 400 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा अहवाल गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रसिद्ध झाला होता. अहवालात असे म्हटले आहे की 2024 मध्ये एकूण 1,529 भारतीयांना परत पाठवण्यात आले होते, तर 2021 मध्ये ही संख्या केवळ 292 होती. 2024 मध्ये, यूएस सरकारने स्थलांतर नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली, ज्या अंतर्गत दर सहा तासांनी एका भारतीयाला निर्वासित केले गेले.
18 हजार अवैध स्थलांतरितांची ओळख पटली –
ब्लूमबर्गने गेल्या महिन्यात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले होते की दोन्ही देशांनी सुमारे 18,000 बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांची ओळख पटवली आहे ज्यांना निर्वासित केले जाणार आहे. मात्र, खरा आकडा कितीतरी जास्त असू शकतो, कारण नेमका आकडा अद्याप कळू शकलेला नाही.





