गोठ्यात अचानक पाणी शिरल्यानं 14 जनावरांचा मृत्यू ! वारजे भागातील दुर्दैवी घटना

Pune News : राज्यातील अनेक जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून तुफान पाऊस होत आहे. राज्यातील अनेक नद्यांची पाणीपातळी वाढली असून पुणे, मुंबई या शहरांमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.
पुण्यात पावसामुळे अनेक छोटे आणि मोठे पूल पाण्याखाली गेले आहेत. शहरातील बहुतांश अंडरपास सुद्धा वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून वाहतूक कोंडी आणि इतर दुर्घटना होऊ नये म्हणून प्रशासन खबरदारी घेत आहे.
तर, दुसरीकडे वारजे येथील स्मशानभूमी परिसरातील नदी पात्रालगत जनावरे बांधली असता नदीपात्रातील पाणी वाढल्याने पाणी गोठ्यात शिरलं. आणि हा संपूर्ण गोठा पाण्याखाली गेला आहे.
या गोठ्यात बांधलेली 14 जनावरे पाण्यात बुडाल्याने दगावली आहेत. यामध्ये 11 गाईंचा समावेश आहे. तर चार ते पाच जनावरे पाण्यात तोंड वर करून उभी राहिल्याने बचावली आहेत. रात्री अचानक पाऊस झाल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे.
खडकवासलाचा विसर्ग रात्री वाढवल्याने पूर
खडकवासला धरणातील विसर्ग राञी थेट 35 हजार क्यूसेक पर्यंत वाढवल्याने मुठा नदीला मोठा पूर आला होता. पण आता खडकवासला धरणातला विसर्ग 15 हजारांपर्यंत कमी करण्यात आलाय. त्यामुळे मुठा नदी पुराचं पाणीही आता काही प्रमाणात ओसरल्याचं बघायला मिळतंय.
दरम्यान, पुणे मनपासमोरचा गाडगीळ पूल हा 10 वर्षांनंतर आज पहाटे पहिल्यादाच पुराच्या पाण्याखाली गेला होता. आता तिथलंही पाणी ओसरलं असलं तरी पाटील इस्टेट, पुलाची वाडी या नदी काठच्या वस्त्यांमध्ये अजूनही काही ठिकाणी पुराचं पाणी दिसतंय.





