पुणे – शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला असून, महापालिकेने घरोघरी तपासणी मोहीम सुरू केले आहे. ज्यांच्या घरी किंवा सोसायट्यांच्या आवारात डासांची उत्पत्ती झाल्याचे आढळेल त्यांच्याकडून दंड वसूल करण्यालाही सुरूवात केली आहे.
महापालिकेने जानेवारीपासून आतापर्यंत या पथकाने 1500 जणांना डेंग्यू डासोत्पत्ती प्रकरणी नोटीस बजावल्या आहेत. वारंवार नोटीस देऊनही त्या ठिकाणी डासोत्पत्ती झाल्याप्रकरणी 1 लाख 14 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
डासोत्पत्ती न होण्यासाठी पाणी साठू न देण्याची जबाबदारी त्या-त्या आस्थापना, घरे आणि सोसायटयांची आहे. तसेच बांधकामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डासोत्पत्ती होते.
ती होऊ न देण्याची जबाबदारी संबंधित विकसक किंवा बांधकाम व्यावसायिकाची आहे. सरकारी कार्यालये, खासगी रुग्णालये यांचीही जबाबदारी आहे. याआधी पोलीस ठाण्याचे आवार, पीएमपी कार्यालये, डेपो, हॉस्पिटल येथे डेंग्यू डासांची उत्पत्ती आढळल्याचे दिसून आलेले आहे.