Sangli News : परीक्षेच्या पूर्वसंध्येला बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्त्या; परिसरात मोठी खळबळ

सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 12 वीच्या विद्यार्थ्याने परीक्षेच्या एक दिवस अगोदरच टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली. भारतनगरमधील गवळी प्लॉटमध्ये वास्तव्य असलेल्या प्रथमेश बाळासाहेब बिराजदार असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रथमेश बिराजदार हा खासगी अकादमीमध्ये बारावीचे शिक्षण घेत होता. सोमवारी रात्री परीक्षेची पूर्व तयारी कशी करायची, पेपर कसा सोडवायचा याबाबतचे अकादमीमध्ये मार्गदर्शन घेउन घरी आला होता. घरी आल्यानंतर बहिणीसोबत चेष्टा मस्करी करून तो अभ्यासासाठी वरच्या मजल्यावर गेला. मात्र, याच खोलीत त्याने अँगलला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.
रात्री नऊ वाजणेच्या सुमारास कुटुंबातील सदस्य प्रथमेशला जेवायला बोलवण्यास वरच्या मजल्यावर गेल्यानंतर त्यांने गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अधिक तपास सुरू केला आहे. दरम्यान, परीक्षेच्या तणावातूनच प्रथमेश बिराजदार या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
प्रथमेशचे वडील मिरजेत कृषी विभागात सहाय्यक आहेत. प्रथमेश हा अभ्यासातही चांगला होता. मात्र, त्याने आत्महत्या का केली, याबाबत गूढ निर्माण झाले आहे. प्रथमेशने टोकाचे पाऊल उचलल्याने गावात हळहळ व्यक्त होत असून याबाबत गांधी चौक पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.





