२४ तासात गाझामधील १२३ ठार; इस्रायलकडून जोरदार बॉम्ब हल्ला
गाझा सिटी – बुधवारी इस्रायलच्या सैन्याने गाझा शहरावर केलेल्या हल्ल्यामध्ये १२३ लोक ठार झाले, असे गाझा आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. हमासने इजिप्तच्या मध्यस्थांशी पुढील चर्चा केली असतानाच इस्रायलने हा हल्ला केला आहे. २४ तासांच्या कालावधीमध्ये इतक्या मोठ्या संख्येने लोक मारले जाण्याची या आठवड्याभरातील ही पहिलीच वेळ आहे.
गाझा सिटीचे लष्करी नियंत्रण घेण्याच्या कल्पनेला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील पाठिंबा दिला असल्याचा दावा इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी केला आहे. पॅलेस्टिनींनी गाझामधून चक्क निघून जावे, असे ट्रम्प यांनी म्हटल्याचे नेतान्याहू यांनी सांगितले.
तर गाझा लोकसंख्येला विस्थापित करण्याच्या कल्पनेने अरब आणि अनेक जागतिक नेते अस्वस्थ आहेत. १९४८ च्या युद्धादरम्यान लाखो पॅलेस्टिनी लोक पळून गेले किंवा त्यांना जबरदस्तीने बाहेर काढण्यात आले. आता पॅलेस्टिनी लोकांसाठी आणखी एक आपत्ती आल्याचे स्थानिक पॅलेस्टिनी म्हणू लागले आहेत.
इस्रायली विमाने आणि रणगाड्यांद्वारे गाझा शहराच्या पूर्वेकडील भागात जोरदार बॉम्बहल्ला केला. रात्रीतून झालेल्या या हल्ल्यात झीटौन आणि शाझिया परिसरात अनेक घरे उद्ध्वस्त झाली. झीटौनमधील एका घरावर झालेल्या हवाई हल्ल्यात १२ जणांचा मृत्यू झाला, असे अल-अहली रुग्णालयाने सांगितले.
तर दक्षिण गाझामधील खान युनूसच्या पूर्वेलाही टँकने अनेक घरे उद्ध्वस्त केली, तर मध्यभागी इस्रायली गोळीबारात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये मदत शोधणाऱ्या नऊ जणांचा मृत्यू झाला, असे पॅलेस्टिनी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. इस्रायली सैन्याने यावर कोणतीही टिप्पणी केलेली नाही.





