‘अमृत भारत स्टेशन’ योजनेत बारामतीसह पुणे जिल्ह्यातील 12 रेल्वे स्थानकांचा समावेश

बारामती – भारतीय रेल्वेच्या ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण होणार असून, यामध्ये पुणे जिल्ह्यातील 12 स्थानकांचा समावेश आहे. या योजनेद्वारे प्रवाशांना आधुनिक सुविधा मिळणार आहेत. बारामती रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी 11 कोटी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
या योजनेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर (मध्य आणि पश्चिम), अंधेरी, टिळक टर्मिनस, पुणे, नाशिक रोड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, परभणी, सोलापूर, सातारा, सांगली आदी प्रमुख स्थानकांचा समावेश आहे. तसेच, उपनगरीय आणि ग्रामीण भागातील स्थानकांनाही या योजनेत स्थान मिळाले आहे.
पुणे जिल्ह्यात पुणे जंक्शन, शिवाजीनगर, लोणावळ्यासह नऊ स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे. बारामती (11 कोटी 40 लाख), दौंड (44 कोटी), केडगाव (12 कोटी 50 लाख), आकुर्डी (34 कोटी), चिंचवड (20 कोटी 40 लाख), देहू रोड (8 कोटी 5 लाख), तळेगाव (40 कोटी 34 लाख), हडपसर (25 कोटी) आणि उरुळी स्टेशनसाठी 13 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
या योजनेंतर्गत स्थानकांवर वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट्स, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एस्कलेटर्स आणि डिजिटल सुविधा उपलब्ध होतील. तसेच, स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि शहराशी सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित होईल. या योजनेमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित होईल, अशी अपेक्षा आहे.





