केनियामध्ये छोटे विमान कोसळून १२ जण ठार
Updated On:

नैरोबी – केनियातील क्वाले या किनारपट्टीच्या भागात एक छोटे विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये किमान १२ जण मरण पावले असल्याची भीती व्यक्त होते आहे. हे विमान मसाई मारा राष्ट्रीय अभयारण्याच्या दिशेने जात होते.
डायनी धावपट्टीपासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगराळ आणि जंगली भागात हा अपघात झाला. विमानात एकूण १२ प्रवासी होते. हे सर्व प्रवासी परदेशी पर्यटक होते आणि ते कोणत्या देशाचे नागरिक होते, हे नंतर स्पष्ट करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळले आणि मोठ्या स्फोटानंतर विमानाला आग लागली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मसाई मारा राष्ट्रीय अभयारण्य हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे आणि टांझानियातील सेरेनगेटी येथून दरवर्षी हजारो काळवीट येथे स्थलांतर करतात.





