सातारा – कोरेगाव तालुक्यात आढळल्या 1116 कुणबी नोंदी

कोरेगाव – कोरेगाव तालुक्यात जुन्या दस्तऐवजांमध्ये 1116 कुणबी नोंदी आढळल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विशेष पथकामार्फत या नोंदींची पडताळणी करण्यात येत आहे. शासकीय विभागांकडे असलेल्या अभिलेख्यांमधून नोंदी शोधण्यात येत असल्याने, हा आकडा वाढण्याची शक्यता तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांनी वर्तवली.
राज्य शासनाच्या आदेशानुसार कोरेगाव तालुक्यात मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आला आहे. सुरुवातीला 1032 नोंदी आढळल्या होत्या. त्यानंतर शासकीय विभागांनी राबवलेल्या शोधमोहिमेत नोंदींचा आकडा वाढला असून, मंगळवार (दि. 28) अखेर 1116 नोंदी आढळल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार तथा सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी अमर रसाळ यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथक कोरेगाव तालुक्यातील नोंदींची पडताळणी करत आहे.
या पथकातील अव्वल कारकून सतीश देसाई, सचिन कुचेकर, नितीन देशमुख, शरद सानप, महेश चव्हाण, महसूल सहाय्यक नितीन मतकर व मैनावती बुधावले यांनी बुधवारी तहसील कार्यालयातील बैठक सभागृहात जुन्या अभिलेख्यांचे अवलोकन करून कुणबी नोंदीची पडताळणी केली. काही जुनी कागदपत्रे मोडी लिपीत आढळली असून, त्यासाठी मोडी लिपी तज्ज्ञांची मदत घेण्यात येत आहे. महसूल विभाग, पोलीस दल, पंचायत समिती, शिक्षण विभाग, दुय्यम निबंधक कार्यालय यांच्याकडे असलेल्या नोंदी तपासण्यात येत आहेत, असे डॉ. कोडे यांनी सांगितले.





