‘शोधून आणणाऱ्यांला ११ रु बक्षीस…’ मुंबईत भास्कर जाधव यांच्याविरोधात बॅनरबाजी

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते भास्कर जाधव आणि भाजप नेते नारायण राणे यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. जाधव यांनी महाप्रबोधन यात्रेद्वारे थेट राणेंच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांच्या मुलांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर जाधव यांच्या चिपळूण येथील निवासस्थानी हल्ला करण्यात आला यामुळे जाधव विरुद्ध राणे असा संघर्ष पुन्हा पेटल्याचे पाहायला मिळाले. अशात आता भास्कर जाधव यांच्या विरोधात मुंबई भाजपने पोस्टरबाजी केल्याचे समजते.
जाधव यांनी केलेल्या टीकेनंतर आमदार नितेश राणे यांनी देखील पत्रकार परिषद घेत जाधव यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर प्रकरण जाधव यांच्या घरावर हल्ला करण्यापर्यंत गेलं. यानंतर शिवसैनिक देखील आक्रमक झाले आहेत. त्यात आता भाजपकडून जाधव यांच्या विरोधात मुंबईत बॅनरबाजी करण्यात आली. ‘आपण यांना पाहिलात का ?’ अशा आशयाचे बॅनर भाजपने महिममध्ये लावल्याचे समजते. तसेच शोधून आणणाऱ्याला ११ रु बक्षीस असंही या बॅनरवर लिहिण्यात आलं आहे.
आता कोकणातुन सुरु झालेला वाद थेट मुंबई येऊन पोहचल्याने ठाकरे गटातील कार्यकर्ते विरुद्ध भाजप कार्यकतें असा संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भास्कर जाधव हे आक्रमक पद्धतीने आपली बाजू अनेकदा भाषणांमधून मांडत असतात. आता या टीकेला ते कस उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.





