पिंपरी – रुपीनगर परिसरातील तब्बल 11 जणांना करोनाची लागण झाली आहे. शहरात एकाच दिवशी 11 जणांना लागण होण्याची ही पहिलीच घटना आहे. तर ओटास्कीम, निगडी परिसरात राहणाऱ्या एकाचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील करोना बळींची संख्या चारवर गेली आहे
शुक्रवारी सकाळी ११ जणांचा अहवाल प्राप्त झाला. तर, गुरुवारी (दि.२३) दोनजण करोना बाधित असल्याचे समोर आले होते. यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या करोनाबाधित रुग्णांचा आकडा 60 वर पोहचला आहे. आत्तापर्यंत एकूण 81 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर, 21 जण करोनामुक्त झाले असून आत्तापर्यंत एकूण चौघांचा मृत्यू झाला आहे.
निगडी रुपीनगर परिसरातील एका 26 वर्षीय तरुण करोना बाधित असल्याचा अहवाल गुरुवारी (दि. 23) प्राप्त झाला. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या 25 जणांना महापालिका रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते. त्याचा अहवाल शुक्रवारी सकाळी प्राप्त झाला. त्यामध्ये 11 जण करोना बाधित आहेत. त्यामध्ये २५ ते २८ वयोगटातील सहा पुरुष आहेत. तर 18 ते 24 वयोगटातील तीन महिला आणि तीन वर्षाच्या दोन मुलींचा समावेश आहे. त्यांच्यावर महापालिकेच्या भोसरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान करोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला. यामुळे शहरातील करोना बळींची संख्या चारवर गेली आहे. त्यापैकी तीन पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या हद्दीतील आहेत. तर एक मृत्यू झालेली व्यक्ती शहराच्या हद्दीबाहेरील आहे. तसेच निगडी परिसरातील बळींची संख्या दोनवर गेली आहे.