एकनाथ शिंदेंचा भाजपला शह?; पक्षवाढीसाठी शिवसेनेचे 11 संपर्कमंत्री जाहीर, वाचा संपूर्ण यादी

Eknath Shinde : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 23 जिल्ह्यांमध्ये 11 संपर्क मंत्र्यांची नियुक्ती केली आहे. या 11 मंत्र्यांकडे त्या-त्या जिल्ह्यांमध्ये पक्ष संघटनेची आणि पक्ष वाढीची जबाबदारी असणार आहे. या निर्णयातील राजकीय मेख अशी की या 23 जिल्ह्यांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री आहेत. यातून पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यांमध्येही संघटनेच्या माध्यमातून लक्ष ठेवता येणार आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपनेही अशाच प्रकारचा निर्णय घेतला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पालकमंत्री असलेल्या 17 जिल्ह्यात संपर्क मंत्र्यांची नेमणूक करीत खेळी केली होती. त्यामुळे शिंदे यांनीही अशाच प्रकारचा निर्णय घेत भाजपच्या पावलावर पाऊल टाकले आहे. त्यामुळे महायुती सारं काही आलबेल नसल्याचं बोललं जातं आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे यांनी वादग्रस्त रायगड आणि नाशिकमध्ये संपर्क मंत्र्यांची नियुक्तीच केलेली नाही. या जिल्ह्यांमध्येही संपर्क मंत्री नियुक्ती केली असती तर शिंदे यांनी येथे आपले पालक मंत्री होणार नाहीत, असा मेसेज जाण्याची शक्यता होती. त्यामुळे आपला या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरील क्लेम शिंदे यांनी कायम ठेवला आहे, असे बोलले जात आहे.
११ मंत्र्यांना पक्षवाढीचे जबाबदारी
गुलाबराव पाटील – परभणी, बुलढाणा
उदय सामंत – मुंबई उपनगर, पुणे, सिंधुदुर्ग
शंभूराजे देसाई – सांगली, नगर
संजय राठोड – नागपूर, चंद्रपूर, अमरावती
दादाजी भुसे – धुळे, नंदुरबार
प्रताप सरनाईक – पालघर, सोलापूर
भरतशेठ गोगावले – हिंगोली, वाशीम
संजय शिरसाट – बीड, नांदेड
प्रकाश आबीटकर – अकोला, लातूर
आशिष जैस्वाल – भंडारा, गोंदिया
योगेश कदम – जालना




