Boko Haram attack : नायजेरियात बोको हरामच्या हल्ल्यात १०० जण ठार

मैदागुरी, (नायजेरिया) – बोको हराम या इस्लामी दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यामध्ये नायजेरियामधील किमान १०० जण ठार झाले आहेत. बोको हरामच्या सुमारे ५० दहशतवाद्यांनी योबे प्रांताच्या तारमुवा भागातल्या बाजारपेठेमध्ये रविवारी संध्याकाळी घुसून बेछुट गोळीबार केला. या दहशतवाद्यांनी प्रार्थनास्थळे आणि लोकांच्या घरांना आगीही लावल्या होत्या, असे या भागातील रहिवाशांनी बुधवारी सांगितले.
मात्र या हल्ल्यामध्ये केवळ ३४ जण ठार झाल्याचे योबे प्रांताचे डेप्युटी ग्व्हर्नर इदी बार्दे गुबाना यांनी म्हटले आहे. सुरक्षा विषयक संकटांमध्ये जीवितहानीची आकडेवारी परस्पर भिन्न दाखवली जाणे ही नायजेरियातील नेहमीची गोष्ट आहे.मात्र हे ३४ जण तर एकाच गावात ठार झालेले आहेत, असे स्तानिक नेत्याने म्हटले आहे.
किमान १०२ जण ठार झाल्याची निश्चित आकडेवारी आहे. अजूनही अनेकजण बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा यापेक्षाही जास्त असल्याचे या नेत्याने सांगितले.योबे प्रांतापेक्षा शेजारच्या बोर्नो प्रांतात बोको हरामच्या कारवाया तुलनेने अधिक तीव्र आहेत.
अल कायदाशी संबंधित बोको हराम या इस्लामी दहशतवादी संघटनेने नायजेरियामध्ये दहशतवादी कारवाया सुरू केल्या आहेत. देशात कट्टरवादी शरीया या इस्लामी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी घातपाती कारवाया केल्या जात आहेत. बोको हरामशी संबंधित अनेक गट नायजेरियामध्ये सक्रिय आहेत. या सर्व गटांनी मिळून केलेल्या कारवायांमध्ये आतापर्यंत ३५ हजार लोक ठार झाले आहेत.
तर २० लाखांपेक्षा अधिक लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे. दुष्काळ, राजकीय अस्थिरता आणि दहशतवादामुळे निर्माण झालेल्या विपन्नावस्थेमुळे मोठ्या प्रमाणावर विदेशी मदतीवर अवलंबून रहावे लागते आहे. या वर्षी आतापर्यंत बोको हरामने केलेल्या हल्ल्यांमध्ये १,५०० जण ठार झाले आहेत.
बोको हरामने स्वीकारली जबाबदारी
रविवारच्या हल्ल्याची जबाबदारी बोको हरामने स्वीकारली असून दहशतवादी कारवायांबद्दल काही गावकरी सुरक्षा दलांना माहीती पुरवत असल्याचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केला गेला. गावकऱ्यांनी दिलेल्या गुप्त माहीतीच्या आधारे सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत बोको हरामचे अनेक सदस्य ठार झाले होते, असे संघटनेने म्हटले आहे. नायजेरियाचे अध्यक्ष बोला अहमद तिनूबू यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. मात्र सुरक्षा उपाययोजनांबाबत त्यांनी मौन बाळगले आहे.





