Pune District | थेट बांधावरच काढला 10 लाखांचा विमा

नारायणगाव : येणेरे (ता.जुन्नर) ग्रामपंचायत आणि जुन्नर डाक कार्यालयाच्या वतीने येणेरे परिसरातील शेतकर्यांच्या शेतात जाऊन अपघाती विमा पॉलिसी काढण्यात आली, अशी माहिती येणेरेचे सरपंच अमोल भुजबळ यांनी दिली.
येणेरे गावात चार दिवस गावातील ग्रामस्थांचा अपघाती विमा, आधार अपडेट, बाल आधार व डाक विभागाच्या इतर योजनांची माहिती देण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
येणेरे परिसरात कांदा लागवड चालू असल्याने गावातील ग्रामस्थांना डाक विभागाने आयोजित मेळाव्यास उपस्थित राहणे शक्य नसल्याने सरपंच अमोल भुजबळ यांनी जिल्हा डाक अधीक्षक बाळकृष्ण एरंडे यांना शेतात जाऊन विमा काढण्याची विनंती केली. शेतकर्यांची अडचण लक्षात घेऊन सरपंच अमोल भुजबळ यांच्या विनंतीनुसार जिल्हा डाक अधिक्षक बाळकृष्ण एरंडे यांनी जुन्नर डाक कार्यालयातील कर्मचार्यांना सूचना देऊन शेतात काम करणार्या शेतकर्यांच्या भेटी घेऊन अपघाती विमा काढण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान न होता जुन्नर डाक विभागाच्या कर्मचार्यांनी शेतात काम करणार्या शेतकर्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांचा अपघाती विमा काढण्यात आला.
येणेरे गावात अपघाती विमा नोंदणीसाठी जुन्नर डाक उपविभागाचे भूषण देशमुख, येणारेचे डाक मास्तर बबन गायकवाड व त्यांच्या कर्मचार्यांचे सहकार्य लाभले. मागील वर्षी काढलेल्या विमा पॉलिसीचा दोन व्यक्तींना लाभ मिळाला असल्याची माहिती जिल्हा डाक अधीक्षक बाळकृष्ण एरंडे यांनी दिली. डाक विभागाचा मेळावा यशस्वी होण्यासाठी भावना मोडवे, रोशन पारधी, देवेंद्र देवाडे, अजित गवारी, अंकुश सरोदे, शरद गवारी, अमित मगर, अपेक्षा गोठणे, गणेश गवारी, येणेरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच जितेंद्र ढोले, सदस्य, ग्रामसेवक रवींद्र मलगे व कर्मचारी यांनी परिश्रम घेतल.
सरपंच भुजबळ यांच्या पुढाकार्याने
सरपंच अमोल भुजबळ यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे येणेरे गावातील 18 ते 65 वयोगटातील 360 व्यक्तींचा अपघाती विमा काढण्यात आला आहे. तर 87 शालेय विद्यार्थ्यांचे आधारकार्ड दुरुस्ती, तसेच 0 ते 5 वयोगटातील 23 बालआधारकार्ड काढण्यात आली.





