Pune District : राजगुरुनगर येथील पीडित कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाख

राजगुरुनगर : राजगुरुनगर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेतील दोन मुलींच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाख रुपयांची मदत देण्यात आली. मदतीचा धनादेश खेडच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या हस्ते पीडित मुलींच्या पालकांना आज (दि. 4) सुपूर्त करण्यात आला.
राजगुरुनगर येथे मोलमजुरी करणार्या कुटुंबातील दोन अल्पवयीन मुलीपैकी एकीवर अत्याचार करून दोघी बहिणींची हत्या झाली होती.
त्यांचे मृतदेह पाण्याच्या पिंपात आरोपीने लपवून ठेवले होते. या दुर्दैवी घटनेत राज्यासह देश हादरला होता. यातील आरोपीला मुलींच्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी. यासाठी अनेक आंदोलने झाली, बंद पाळून मोर्चे काढले. दुसर्या बाजूला हतबल असलेल्या या कुटुंबाला आधार देण्यासाठी अनेकजण प्रयत्न करीत आहेत. या कुटुंबाला स्वतःचे घर नाही. तिथे घटना घडल्यामुळे जाण्याची मानसिकता नाही.
अशा स्थितीत हे कुटुंब थिगळस्थळ येथील नातेवाईकांकडे तात्पुरते थांबले आहे. या कुटुंबाला आधार म्हणून शहरातील नागरिकांनी रोख स्वरूपात, वस्तू स्वरूपात किराणा स्वरूपात मदत केली. माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोख स्वरूपात या पीडित कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत ही मदत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते 28 डिसेंबर रोजी दिली होती. या घटनेची दखल घेत खेड तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून तहसीलदार ज्योती देवरे यांनी राज्य शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठवला. विशेष बाब म्हणून राज्य शासनाने याची दखल घेतली.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाख रुपये मंजूर करून हे अर्थ साहाय्य तहसीलदार कार्यालयाकडे वर्ग केले. 10 लाख रुपये अर्थसहाय्य धनादेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी पीडित कुटुंबातील सुनील भानुदास मकवाने याच्याकडे आज (शनिवारी) सुपूर्त केली. यावेळी नायब तहसीलदार डी. पी. माळी, अव्वल कारकून निलेश घोडके, स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे संस्थापक अध्यक्ष हरेश देखणे, पोलीस पाटील निर्मला देखणे, तसेच पीडित मुलींच्या कुटुंबातील सदस्य यावेळी उपस्थित होते.





