पुणे | पीएमआरडीए हद्दीत १० अग्निशमन केंद्र मंजूर

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत अग्निशमन केंद्र उभारण्याची मागणी होत होती. अखेर प्राधिकरणाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौंड, पुरंदर, मुळशी, शिरुर आणि खेड या या तालुक्यात प्रत्येकी एक तर, मावळमध्ये दोन आणि हवेली तालुक्यात तीन असे एकूण 10 अग्निशमन केंद्र मंजूर करण्यात आले आहे.
पीएआरडीएच्या हद्दीत ८१४ गावांचा समावेश होतो. प्राधिकरणाच्या हद्दीत औद्योगिक कंपन्या अनेक आहेत. तसेच औद्योगिक वसाहतीही आहेत. याचसह मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत आहे. त्यामुळे अग्निशमन केंद्रांची आवश्यकता आहे.
जर एखादी दुर्घटना घडली तर पुणे , पिंपरी चिंचवड शहरातून अग्निशमन केंद्रांतून गाड्या बोलवाव्या लागतात. अंतर जास्त असल्याने या गाड्या पोहचण्यास उशीर लागतो. त्यामुळे प्राधिकरणाच्या हद्दीत अग्निशमन केंद्र स्थापन करण्याची मागणी होत होती.
पीएमआरडीए हद्दीतील ३४ जागांवर या केंद्रांसाठी आरक्षण टाकण्यात आले. त्यातील दहा जागा निश्चिच करून तेथे अग्निशमन आणि व्यवस्थापन केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यासाठी १५० कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. यामध्ये अग्निशमन केंद्राची इमारत, कर्मचारी निवासस्थाने, वाहने आणि यंत्रसामुग्रीबाबत कामे करण्यात येणार आहे.
याठिकाणी होणार अग्निशमन केंद्र
तालुका – गाव
दौंड – केडगाव
शिरूर – शिक्रापूर
मावळ – कान्हे
पुरंदर – दिवे
मावळ – पाटण
मुळशी – म्हाळुंगे
खेड – येवलेवाडी
हवेली – वडाचीवाडी, औताडे-हांडेवाडी , मांजरी-वडाचीवाडी





