आनंदाची बातमी ! लाडक्या बहिणींना मिळणार 1 लाखांपर्यंत कर्ज, तेही बिनव्याजी

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यावर 1500 रुपयांचा हप्ता न चुकता जाणे, हे सरकारसमोरील मोठे आव्हान आहे. पण या योजनेमुळे घरबसल्या महिलांना मोठा फायदा झाला असून आता आणखी एक फायदा महिसांना होणार आहे.
तो म्हणजे, भाजप आमदार प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबई (मुंबै) बँकेने लाडक्या बहिणींना 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज 0 टक्के व्याज दराने देण्याचा निर्णय घेतला आहे. लाडक्या बहिणींचे पैसे उद्योग-व्यवसायांच्या माध्यमातून बाजारात आले पाहिजे, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई बँकेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना कर्जपुरवठा करण्यात येत होता. पण याकरिता 9 टक्के व्याज आकारण्यात येत होते. पण आता 9 टक्के व्याजाचा नियम बाद करण्यात आला असून चक्क 0 टक्के व्याज दराने कर्ज देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या 4 महामडंळातील विविध योजनांमधून ही सवलत देण्यात येणार आहे.
राज्य सरकारच्या 4 महामंडळाच्या योजना अशा आहेत की, 12 टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा लाभार्थींना दिला जातो. पर्यटन महामंडळाची आई योजना आहे, ज्या योजनेतून महिलेला 12 टक्क्यांपर्यंत व्याजाचा परतावा दिला जातो.
यासह, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटक्या विमुक्तांसाठीचे महामंडळ आणि ओबीसी महामंडळांच्या योजनांमधून व्याजाचा परतावा महिलांना दिला जातो. त्यामुळे, आम्ही ज्या महिलांना कर्जपुरवठा करत आहोत, त्या लाभार्थी महिला या योजनेत बसत असतील, तर या महिलांना शून्य टक्के व्याजदरात कर्ज उपलब्ध होऊ शकते, असे प्रवीण दरेकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे.





