अमरावतीतील मुलीच्या पोटातून काढला अर्धा किलो केसांचा गोळा; काय आहे ‘हा’ विचित्र आजार?

अमरावती : जिल्ह्यातील एका ग्रामीण भागात राहणाऱ्या दहा वर्षांच्या मुलीची कहाणी ऐकून कोणालाही धक्का बसेल. गेल्या तीन-चार महिन्यांपासून या मुलीला अपचनाचा तीव्र त्रास होत होता. सतत उलट्या, मळमळ, भूक न लागणे आणि पोटदुखी यामुळे ती हैराण झाली होती.
तिच्या कुटुंबीयांनी तिला बरे वाटावे म्हणून गावातील डॉक्टरांपासून ते नागपूरच्या रुग्णालयांपर्यंत अनेक ठिकाणी उपचारासाठी पालथे घातले. सोनोग्राफी, एक्स-रे यांसारख्या अनेक तपासण्या केल्या गेल्या, काही डॉक्टरांनी ॲसिडिटीचे निदान करून औषधे दिली, पण मुलीच्या प्रकृतीत काहीच सुधारणा होत नव्हती.
अखेरीस, कुटुंबीयांनी तिला अमरावतीतील बालरोग शस्त्रक्रिया तज्ज्ञांकडे नेले. तिथे डॉक्टरांनी सखोल तपासणी केली आणि एक धक्कादायक सत्य समोर आले. या मुलीच्या पोटात सुमारे अर्धा किलो वजनाचा केसांचा गोळा आढळला! होय, हे ऐकायला विचित्र वाटत असलं तरी पूर्णपणे खरं आहे. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे हा गोळा यशस्वीपणे काढला, आणि मुलीला हळूहळू आराम मिळू लागला.
या आधीही घडल्या आहेत अशा घटना?
लखनौच्या मुलीच्या पोटातून काढली 2 किलो केसांची गाठ
लखनौच्या बलरामपूर २०२१ मध्ये रुग्णालयात 17 वर्षीय मुलीच्या पोटातून 2 किलो वजनाची केसांची गाठ (ट्रायकोबेझार) शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आली. गेल्या 2 वर्षांपासून तिला अशक्तपणा, केसगळती, पोटदुखी आणि उलट्या यांचा त्रास होता. तपासणीत तिच्या पोटात 20 सेंमी लांबीचा केसांचा गोळा आढळला, जो ट्रायकोफॅजिया या मानसिक आजारामुळे तयार झाला. या आजारात व्यक्ती स्वतःचे केस खाते, जे पोटात जमा होऊन गंभीर समस्या निर्माण करते.
वसईमध्ये ३२ इंच लांबीचे १.२ किलो वजनाचे केस
वसई येथील १३ वर्षीय मुलीची कहाणीही कमी धक्कादायक नाही. २०२३ मध्ये तिला पोटदुखीच्या तक्रारीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला अपचन आणि ॲसिडिटीचे उपचार केले गेले, पण प्रकृतीत सुधारणा न झाल्याने सोनोग्राफी करण्यात आली. त्यात तिच्या आतड्यांमध्ये ३२ इंच लांबीचा आणि १.२ किलो वजनाचा केसांचा गोळा आढळला. शस्त्रक्रियेद्वारे हा गोळा काढण्यात आला, आणि मुलीला आराम मिळाला. या मुलीला देखील ट्रायकोफॅजिया या आजारामुळे केस खाण्याची सवय लागली असावी, ज्यामुळे ही गंभीर समस्या उद्भवली.
काय आहे हा विचित्र आजार?
या मुलीला झालेला आजार आहे ट्रायकोबेझार (Trichobezoar), जो ट्रायकोफॅजिया (Trichophagia) नावाच्या मानसिक विकारामुळे उद्भवतो. ट्रायकोफॅजिया हा एक असा आजार आहे, ज्यामध्ये व्यक्तीला स्वतःचे किंवा इतरांचे केस खाण्याची सवय लागते. ही सवय प्रामुख्याने तणाव, चिंता किंवा मानसिक अस्वस्थतेमुळे विकसित होऊ शकते. खाल्लेले केस पोटात जमा होऊन गोळ्याच्या स्वरूपात अडकतात, ज्याला ट्रायकोबेझार म्हणतात. हा गोळा पोटात अन्नपचनास अडथळा आणतो, ज्यामुळे उलट्या, मळमळ, पोटदुखी यांसारखी लक्षणे दिसतात.
या आजाराचे वैशिष्ट्य आणि उपचार
ट्रायकोफॅजिया हा आजार दुर्मीळ असला तरी यापूर्वीही अनेक रुग्ण आढळले आहेत. हा आजार प्रामुख्याने मुली आणि तरुण स्त्रियांमध्ये जास्त आढळतो, विशेषतः ज्यांना तणाव किंवा मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. या मुलीच्या बाबतीतही तणाव किंवा इतर मानसिक कारणांमुळे ती स्वतःचे केस खात असावी, असा डॉक्टरांचा अंदाज आहे. यावर उपचार म्हणून शस्त्रक्रियेद्वारे केसांचा गोळा काढणे आवश्यक असते. त्याचबरोबर, मानसशास्त्रीय उपचार आणि समुपदेशनाद्वारे रुग्णाला ही सवय सोडण्यास मदत केली जाते.





