हिमा दासचा सुवर्णपदकांचा धडाका सुरूच : पाचव्या सुवर्णपदकाला गवसणी

नवी दिल्ली : भारताची अव्वल धावपटू हिमा दास हिचा सुवर्णपदकांचा धडाका सुरूच आहे. कारण तिने पाचव्या सुवर्णपदकाला गवसणी घातली. मेटूजी ग्रां. प्रि. ऍथलेटिक्स स्पर्धेत हिमाने महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत 52.9 सेकंद अशा वेळेसेह सुवर्णपदक पटकावले.
गेल्या 15 दिवसांत 200 मीटर शर्यतीत चार सुवर्णपदके पटकावणाऱ्या हिमाने 400 मीटर शर्यतीत पहिल्यांदाच धावत या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. या शर्यतीत भारताच्या खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळाले. व्ही. के. विस्मया हिने 52.48 सेकंद अशी कामगिरी करत रौप्यपद पटकावले. सरिताबेन गायकवाड हिने 53.48 सेकंदासह कांस्यपदक तर एम. आर. पूवाम्मा हिने 53.74 सेकंदासह चौथा क्रमांक प्राप्त केला. पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या नोह निर्मल टॉम याने 45.06 सेकंदासह रौप्यपदक पटकावले. कझाकस्तानच्या माझेन अल-यासिन याने 45.98 सेकंद अशी कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले. पुरुषांच्या 200 मीटर शर्यतीत मोहम्मद अनास याने 20.95 सेकंदासह रौप्यपदक जिंकले.





