सायकल चोरट्यांना अटक

नागठाणे – बोरगाव पोलीस ठाणे हद्दीतून सायकली चोरून साथीदारांमार्फत विकणाऱ्या एका अल्पवयीन संशयितासह तीन संशयितांना पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून तीन लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. बोरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेंद्र जगन्नाथ घोरपडे (रा. खोजेवाडी ता. सातारा) यांच्या घराच्या पार्किंगमधून दि. 1 रोजी रात्री 9 च्या सुमारास 12 हजार रूपये किंमतीची एक सायकल चोरीस गेली होती.
याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल होती. या चोरीच्या अनुषंगाने डीबी टीम संशयिताच्या मागावर होती. मिळालेल्या माहितीनुसार एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता आणखी दोघे संशयित निष्पन्न झाले. महाग सायकली चोरणाऱ्या एका अल्पवयीन मुलासह प्रकाश धनाजी जाधव (वय 50, रा. (मि) अपशिंगे), भंगार व्यावसायिक नासिर खालिद खान (वय 38, रा. वर्णे ता. सातारा) या संशयितांना जेरबंद केले. संशयितांकडून सातारा शहर, सांगली ,कोल्हापूर येथून 19 महागड्या सायकली व गुन्ह्यात वापरलेला ऍपे रिक्षा टेंपो असा एकूण 2 लाख 92 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केले असता 1 दिवसाची कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई बोरगाव पोलिस ठाण्याचे सपोनि रवींद्र तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. अमोल गवळी, अमोल सपकाळ, दादा स्वामी, सुनील कर्णे, प्रशांत चव्हाण, कॉ. विशाल जाधव, केतन जाधव यांनी केली. बोरगाव पोलिस ठाणे परिसर तसेच इतर ठिकाणांवरून चोरीस गेलेल्या या सायकली ताब्यात घेतल्या आहेत. ज्यांच्या सायकली असतील त्यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात संपर्क साधून ओळख पटवून योग्य कायदेशीर कार्यवाही पूर्ण करून सायकली घेऊन जाव्यात, असे आवाहन रवींद्र तेलतुंबडे यांनी केले आहे.





