Potholes In Satara: खड्ड्यात गेला गणेशोत्सव? राजवाडा ते पेठांपर्यंत खड्ड्यांचे साम्राज्य; पहा शहरातील धक्कादायक वास्तव
Potholes In Satara: राजवाडा, राधिकारोड अन् पेठांमधील रस्त्यांची चाळण; गणेशमूर्ती सुरक्षित आणायच्या कशा? गणेश मंडळांसमोर मोठे आव्हान.

Potholes In Satara – गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना सातारा शहरातील रस्त्यांची दुरवस्था उघड्यावर आली आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि अंतर्गत मार्ग अक्षरशः खड्ड्यांच्या विळख्यात सापडले असून, पावसाचे पाणी साचल्याने अनेक खड्ड्यांची खोलीच दिसेनाशी झाली आहे.
एकीकडे गणरायाच्या स्वागताची लगबग सुरू असताना दुसरीकडे नागरिकांना खड्डे चुकवत मार्ग काढण्याची वेळ आली आहे. प्रशासनाच्या कारभाराविरोधात नागरिक आणि गणेश मंडळांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सातार्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विविध मंडळांच्या भव्य गणेशमूर्ती शहरात दाखल होतात. त्यासाठी सजावट, मिरवणुका आणि आगमन सोहळ्यांची तयारी सुरू झाली आहे.
राजवाडा बसस्थानक परिसरात चिखलाचे साम्राज्य
राजवाडा मुख्य बसस्थानक हा शहराचा महत्त्वाचा वाहतूक केंद्रबिंदू आहे. एसटी बसेसची सततची ये-जा आणि त्यातच खड्डेमय रस्ते यामुळे परिसराची अवस्था बिकट झाली आहे. पावसाचे पाणी आणि चिखलामुळे प्रवाशांना बसस्थानक परिसरातून चालणेही त्रासदायक ठरत आहे. सणाच्या काळात प्रवाशांची गर्दी वाढल्यानंतर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
पेठांमधील रस्तेही खड्ड्यात
शाहूपुरी, शनिवार पेठ, रविवार पेठ तसेच मध्यवर्ती बाजारपेठेतील अंतर्गत रस्त्यांची अवस्था चिंताजनक आहे. सणासुदीच्या खरेदीसाठी या भागात मोठी गर्दी होणार असताना अरुंद आणि खड्डेमय रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
पारंगे चौक ते गेंडमाळ नाका परिसरात मिरवणुकांसमोर अडथळे
पारंगे चौक, गेंडमाळ नाका आणि शहरातील विविध उपनगरांना जोडणार्या मार्गांवरही डांबरीकरणाची अक्षरशः चाळण झाली आहे. याच मार्गांवरून गणेश मंडळांच्या मूर्तींच्या आगमनाच्या मिरवणुका होतात. उंच आणि भव्य मूर्ती घेऊन जाणार्या वाहनांना खड्डयांमुळे मोठी कसरत करावी लागणार आहे.
विलासपूर, कॅम्प परिसरात विद्यार्थ्यांचीही गैरसोय
विलासपूर भागातील अंतर्गत रस्त्यांवर पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. कल्याणी शाळा आणि कॅम्प परिसरात सकाळ-संध्याकाळ विद्यार्थी व पालकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे खराब रस्ते आणि खड्डे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण करीत आहेत.
गणेशोत्सवापूर्वी युद्धपातळीवर कामाची मागणी
केवळ वरवरची मलमपट्टी न करता खड्ड्यांमध्ये दर्जेदार पॅचवर्क करून रस्ते वाहतुकीसाठी सुरक्षित करावेत, अशी मागणी नागरिक आणि गणेश मंडळांकडून होत आहे. गणरायाच्या स्वागतासाठी सातारा सज्ज होत असताना शहरातील रस्त्यांची अशी अवस्था राहणे ही प्रशासनासाठी निश्चितच लाजिरवाणी बाब आहे. गणेशोत्सवापूर्वी रस्ते दुरुस्त करा, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जा, अशी संतप्त भावना शहरवासीयांमधून व्यक्त होत आहे.






