Eknath Shinde : सातार्यात शिंदेंची तोफ धडकणार! अंतर्गत बंडाळी शमणार की वाद आणखी पेटणार?
Eknath Shinde : मेळावा केवळ गर्दीसाठी नाही तर पक्षांतर्गत मरगळ झटकण्यासाठी; निष्क्रिय कार्यकर्त्यांवर गाजणार का कारवाईची कुऱ्हाड?

Eknath Shinde – शिवसेना शिंदे गटाचा मेळावा सातारा येथील गांधी मैदानावर उद्या, दि. 20 रोजी होणार आहे. हा मेळावा जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून काढण्याची चिन्हे आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणारी सभा शक्तिप्रदर्शनापुरती मर्यादित न राहता, स्थानिक पातळीवरील संघटनात्मक स्थितीचा आढावा घेणारी असल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषदेची सत्ता गमावल्यानंतर पक्षासमोर नव्याने उभारी घेण्याचे मोठे आव्हान आहे.
त्यातच जिल्ह्याच्या काही भागांमधील कार्यकर्त्यांची निष्क्रियता आणि गटबाजी यामुळे पक्षसंघटना सशक्त करण्याची गरज अधिक आहे. या पार्श्वभूमीवर या मेळाव्याकडे कार्यकर्त्यांना पुन्हा सक्रिय करण्याचा आणि नाराजी दूर करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. सातार्यात मोजक्या नेत्यांभोवती पक्ष फिरताना दिसत असून, त्यांच्यातील समन्वयाच्या अभावाबाबत प्रश्न उपस्थित होतात. विशेषतः अलीकडील राजकीय घडामोडीनंतर काही नेत्यांच्या भूमिकांवर स्थानिक स्तरावर चर्चा रंगली आहे.
त्यामुळे या सभेत कोणते नेते पुढे राहतात आणि कोण अलिप्त राहतात, यावरून पुढील राजकीय समीकरणांची दिशा ठरण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणातून संघटनात्मक धोरणाची दिशा स्पष्ट होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र, ते स्थानिक पातळीवरील मतभेदांवर भाष्य करणार, की सौम्य भूमिका घेतात, याकडेही लक्ष असेल.
या पार्श्वभूमीवर मेळाव्याचे यश केवळ गर्दीवर मोजले जाणार नसून, त्यातून पक्षाच्या कार्यकर्त्यांना कितपत ऊर्जा मिळणार आणि अंतर्गत मतभेद कितपत कमी होणार, यावरच त्याचे मूल्यमापन होणार आहे. हा मेळावा जिल्ह्यातील राजकारणात नवा टप्पा ठरणार की पक्षांतर्गत तणाव अधिक तीव्र होणार, हे लवकरच स्पष्ट होईल.





