Dam Tourism: कोयनेच्या जलाशयातून येणार पर्यटनाची नवी लाट; काय आहे सरकारचा ‘डॅम टुरिझम’ महाप्लॅन?
Dam Tourism: शिवसागर जलाशय, सह्याद्रीच्या रांगा आणि धबधब्यांचे आकर्षण; जलपर्यटनासह स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी होणार उपलब्ध.

विजय लाड
Dam Tourism – महाराष्ट्रातील प्रमुख धरणांच्या परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करून राज्याच्या पर्यटनाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न महायुती सरकार करणार आहे. धरणे, जलाशय, निसर्ग आणि परिसरातील पर्यटनस्थळांना एकत्र जोडून ‘डॅम टुरिझम’ला चालना देण्याचा ही महायोजना आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून या पर्यटन विकासाला गती देण्याचा प्रयत्न सुरु आहे.
या योजनेत कोयना धरणाला विशेष महत्त्व मिळण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज जलाशयाचा विस्तीर्ण परिसर, सह्याद्रीच्या डोंगररांगा, धबधबे, जंगल आणि निसर्गसंपदा यामुळे कोयना ‘डॅम टुरिझम’चे प्रमुख केंद्र बनू शकते. कोयना धरणाचा जलाशय पर्यटकांसाठी आकर्षण ठरण्याबरोबरच स्थानिक रोजगार आणि व्यवसायाला नवी संधी देऊ शकतो.
पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी कोयना परिसराला पर्यटन हब बनविण्याची भूमिका यापूर्वीच मांडली आहे. पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याबरोबरच कोयना परिसरातील पर्यटनस्थळांचा विकास करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. कोयना धरण, शिवसागर जलाशय, कोयनानगर, नवजा आणि ओझर्डे धबधबा यांना जोडून स्वतंत्र पर्यटन सर्किट उभारण्याची मोठी संधी आहे.
जलपर्यटन, निसर्गभ्रमंती, ट्रेकिंग, पक्षीनिरीक्षण आणि साहसी पर्यटनाला चालना मिळाल्यास पर्यटकांचा मुक्काम वाढू शकतो. पर्यटन विकासातून स्थानिक युवकांना रोजगार मिळणेही महत्त्वाचे आहे. होम स्टे, पर्यटन मार्गदर्शक, वाहनसेवा, स्थानिक खाद्यपदार्थ आणि अन्य पर्यटन व्यवसायांच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते.
महिला बचत गट आणि स्थानिक उद्योजकांनाही या पर्यटन विकासाशी जोडता येईल. मात्र, कोयना हा जैवविविधतेने समृद्ध परिसर असल्याने पर्यटन आणि पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक आहे. कचरा व्यवस्थापन, प्लॅस्टिक नियंत्रण, वन्यजीव संरक्षण, पर्यटकांची सुरक्षितता आणि आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास याला प्राधान्य द्यावे लागणार आहे.
कोयना आता पर्यटनाची भाग्यलक्ष्मी!
कोयना धरणाने महाराष्ट्राला ऊर्जा दिली; आता त्याच कोयनेच्या जलाशयातून पर्यटनाची नवी लाट निर्माण करण्याची संधी आहे. दहा प्रमुख धरणांच्या पर्यटन विकासाचा महायुती सरकारचा महाप्लॅन प्रत्यक्षात उतरला, तर कोयना ‘डॅम टुरिझम’चा महाराष्ट्रातील प्रमुख चेहरा बनू शकते. धरण, जलाशय, सह्याद्री, धबधबे आणि निसर्ग यांचा संगम कोयनाला इतर धरणांपेक्षा वेगळी ओळख देतो. दहा धरणांचा महाप्लॅन आणि कोयनाच्या जलसागरातून पर्यटनाची नवी लाट, अशी ही महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाची नवी दिशा ठरू शकते.






