Satara: बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी दणका; बोगसगिरीला बसणार चाप
Satara 2025-26 च्या प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रियेत संवर्ग एकचा लाभ मिळवण्यासाठी काही शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्रांचा गैरवापर केल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. खर्या दिव्यांगांना न्याय मिळणे अपेक्षित असताना, आरोग्य विभागाशी कथित संगनमतातून धडधाकट शिक्षकांनीही दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून, सोयीच्या बदलीचा मार्ग शोधल्याचे आरोप झाले. परिणामी, पात्र शिक्षकांवर अन्याय होत होता.

Satara: दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणार्या शिक्षकांविरोधात उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने कारवाईचा धडाका लावला आहे. नऊ शिक्षकांचे निलंबन, 13 शिक्षकांना सक्तीच्या सेवानिवृत्तीच्या नोटिसा आणि आता 11 ते 39 टक्के दिव्यांगत्व आढळलेल्या 74 शिक्षकांचे दिव्यांग आरक्षण आधारित सेवाविषयक लाभ बंद करण्याचे आदेश, अशा कारवाईने जिल्ह्याच्या शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी कारवाई केली आहे. शिक्षण विभागाबरोबर अन्य विभागांमधील बोगसगिरीला चाप लावण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून प्रक्रिया सुरू आहे.
2025-26 च्या प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रियेत संवर्ग एकचा लाभ मिळवण्यासाठी काही शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्रांचा गैरवापर केल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. खर्या दिव्यांगांना न्याय मिळणे अपेक्षित असताना, आरोग्य विभागाशी कथित संगनमतातून धडधाकट शिक्षकांनीही दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून, सोयीच्या बदलीचा मार्ग शोधल्याचे आरोप झाले. परिणामी, पात्र शिक्षकांवर अन्याय होत होता. शासनाच्या धोरणानुसार संवर्ग एकमधून दिव्यांगत्वाच्या आधारे बदलीचा लाभ घेतलेल्या शिक्षकांच्या फेरतपासणीची प्रक्रिया याशनी नागराजन यांनी हाती घेतली. या तपासणीत शेकडो शिक्षक अपात्र ठरले. या शिक्षकांचे संवर्ग एकमधील बदलीचे लाभ काढून घेण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद प्रशासनाला दिले. त्यानंतर नागराजन आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी अनेक शिक्षकांचे बदली लाभ रद्द केले.
या प्रकरणात जिल्हा परिषद प्रशासनाने दोन शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले होते. तीन शिक्षकांना निलंबित करुन, 38 शिक्षकांचे बदली लाभ काढून घेतले होते. या कारवाईनंतर अनेक शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने नियमबाह्य लाभ घेतल्याचा आरोप असलेल्या शिक्षकांविरोधात चार दिवसांत कारवाईचा धडाका लावला आहे. नऊ शिक्षकांचे निलंबन, 13 शिक्षकांना सक्तीच्या सेवानिवृत्तीच्या नोटिसा, 74 शिक्षकांचे सेवाविषयक लाभ रद्द करण्याचे आदेश नागराजन यांनी दिले आहेत. या शिक्षकांच्या सेवा पुस्तकांमध्ये या आदेशाची नोंद करुन, त्याच्या प्रमाणित प्रती जिल्हा परिषद प्रशासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
11 ते 39 टक्के दिव्यांगत्व आढळलेल्या 74 शिक्षकांचे सेवाविषयक सर्व लाभ रद्द करण्याची कार्यवाही उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू आहे. यामध्ये पदोन्नती, बदली सवलत, वाहतूक भत्ता, नियमित व्यावसायिक कर आणि यापूर्वी माफ असलेला प्राप्तिकर पुन्हा लागू करण्याचा समावेश आहे. या आदेशांची नोंद शिक्षकांच्या सेवा पुस्तकांमध्ये घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधितांची बदली दुर्गम कार्यक्षेत्रात करण्यात येणार आहे.





