Satara: डॉ. नितीन देशपांडे यांना ‘डॉक्टरेट ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन’ पदवी
Satara आजच्या वेगाने बदलणार्या कॉर्पोरेट वातावरणात मानव संसाधन (एचआर) प्रमुखांच्या नेतृत्वशैलीवर कसा परिणाम होतो, याचा सखोल अभ्यास त्यांनी केला आहे. जागतिक स्तरावरील गतिमान व्यावसायिक आव्हानांना यशस्वीरित्या सामोरे जाण्यासाठी एचआरप्रमुखांनी कोणती महत्त्वाची व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्ये आत्मसात करावीत, हे त्यांनी आपल्या संशोधनात स्पष्ट केले आहे.

Satara: कूपर कॉर्पोरेशनचे मुख्य मानव संसाधन अधिकारी (सीएचआरओ) डॉ. नितीन प्रभाकरराव देशपांडे यांना स्वित्झर्लंड येथील स्विस इंटरनॅशनल मॅनेजमेंट अॅकॅडमीतर्फे ‘डॉक्टरेट ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन’ ही प्रतिष्ठेची पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली. डॉ. देशपांडे यांनी ‘व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्ये आणि राष्ट्रीय संस्कृतीचा नेतृत्वशैलीवरील प्रभाव’ या विषयावर संशोधन केले.
आजच्या वेगाने बदलणार्या कॉर्पोरेट वातावरणात मानव संसाधन (एचआर) प्रमुखांच्या नेतृत्वशैलीवर कसा परिणाम होतो, याचा सखोल अभ्यास त्यांनी केला आहे. जागतिक स्तरावरील गतिमान व्यावसायिक आव्हानांना यशस्वीरित्या सामोरे जाण्यासाठी एचआरप्रमुखांनी कोणती महत्त्वाची व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्ये आत्मसात करावीत, हे त्यांनी आपल्या संशोधनात स्पष्ट केले आहे. डॉ. देशपांडे यांनी अहमदाबाद येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेतून कार्यकारी व्यवस्थापन शिक्षण पूर्ण केले. नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून मानव संसाधन विषयात एमबीए, फायर सेफ्टी अँड एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदविका, डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल्स या विषयात अभियांत्रिकी पदवी मिळवली आहे.
कूपर कॉर्पोरेशनमध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी गरवारे हायटेक फिल्म्समध्ये 24 वर्षे मानव संसाधन विकास विभागाच्या वरिष्ठ महाव्यवस्थापकपदी काम केले होते. ते गेल्या 16 वर्षांपासून ते कूपर कॉर्पोरेशनमध्ये कार्यरत आहेत. डॉ. देशपांडे यांनी ‘मॅनेजमेंट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग’ या पुस्तकाचे लेखन केले असून, इन्स्ट्रुमेंटेशन आणि सुरक्षा कार्यपद्धतींवर त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट, सह्याद्रीच्या सातारा चॅप्टरचे अध्यक्ष असताना, सातार्यात भव्य पश्चिम विभागीय परिषद नुकतीच झाली. पुणे विभागीय रोजगार मेळावा समन्वय समितीच्या प्रमुख सदस्यपदी राज्य शासनाने त्यांची निवड केली असून, रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील रिसर्च फाउंडेशनचे ते नामनिर्देशित संचालक आणि सातारा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. या कामगिरीबद्दल कूपर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक फरोख कूपर, संचालक आणि कंपनीच्या कर्मचार्यांनी डॉ. देशपांडे यांचे अभिनंदन केले.




