विशेष : सुरक्षित मातृत्व?
आजच्या विज्ञान-तंत्रज्ञान युगातही ‘सुरक्षित मातृत्वा’ची (Motherhood Day) शाश्वती नाही, ही वस्तुस्थिती आहे. 10 जुलै हा दिवस ‘मातृसुरक्षा दिन’ म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. त्यानिमित्त...

– अमेय गुप्ते
Motherhood Day : आजच्या विज्ञान-तंत्रज्ञान युगातही ‘सुरक्षित मातृत्वा’ची (Motherhood Day) शाश्वती नाही, ही वस्तुस्थिती आहे. 10 जुलै हा दिवस ‘मातृसुरक्षा दिन’ म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. त्यानिमित्त…
‘स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते’ हे आपण अनेक वर्षे ऐकत आलो आहोत.आई ही कुटुंबाचा आणि समाजाचा आधारस्तंभ असून, निरोगी माता म्हणजे निरोगी कुटुंब आणि सुदृढ समाज (Motherhood Day) असल्याचे मानले जाते.
त्यामुळे गर्भधारणेपासून प्रसूतीनंतरच्या काळापर्यंत मातेच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे ही केवळ कुटुंबाची नव्हे, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. याच उद्देशाने जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) मातांचे आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी 2005 पासून दरवर्षी 10 जुलै हा दिवस ‘मातृसुरक्षा दिन’ म्हणून साजरा केला जातो.
या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सुरक्षित मातृत्वाविषयी (Motherhood Day) जनजागृती करणे, गर्भवती महिलांना वेळेवर आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे आणि माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे हे आहे. प्रत्येक स्त्रीने गर्भधारणेदरम्यान नियमित आरोग्य तपासणी करणे, संतुलित आहार घेणे, आवश्यक लसीकरण करणे, रक्तदाब व हिमोग्लोबिनची तपासणी करणे, तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे हे अत्यंत आवश्यक आहे.
पूर्वीच्या काळी बाळंतपणे घरात होत असत. त्याकाळी सुईण बोलावून गरोदर स्त्रीची प्रसूती होत असे.पण असे करणे धोक्याचे असे. यामुळे त्या स्त्रीच्या व बाळाच्या जीवाला नकळत धोका पोहोचण्याचा संभव असे. तसेच त्याकाळी जन्माला येणार्या अपत्याच्या वयात अवघे एक ते दीड वर्षाचे अंतर असे. यामुळे त्या स्त्रीच्या आरोग्याला धोका पोहोचत असे. तर कधी आठ ते दहा बाळंतपणे झाल्यामुळे त्या स्त्रीला बाळंतरोग होत असे. आजही महाराष्ट्रातील काही ग्रामीण भागात घरातच जन्म होत आहेत.
गरोदर स्त्रीची प्रसूती जर प्रशिक्षित आरोग्य कर्मचार्यांच्या उपस्थितीत किंवा सुसज्ज आरोग्य केंद्रात झाल्यास आई व बाळ दोघांच्याही सुरक्षिततेची खात्री अधिक वाढते. गेल्या काही वर्षांपासून जरी मातांच्या आरोग्याबाबत काळजी घेतली जात असली, तरी हजारो महिलांनी गरोदरपणात तसेच प्रसूती नंतर आपला जीव गमावला असल्याचे अनेक अहवालांतून समोर येते.
मातृमृत्यू दर (एमएमआर) म्हणजे गर्भधारणेचे ठिकाण किंवा कालावधी विचारात न घेता, गर्भधारणा किंवा गर्भपात यामुळे दर 1,00,000 जिवंत जन्मांमागे होणार्या मातांच्या मृत्यूंची संख्या. महिलांमधील गर्भधारणेशी संबंधित धोका दर्शवण्यासाठी मातृमृत्यू दराचा वापर केला जातो. सर्वात कमी माता मृत्यूदर असलेले राज्य केरळ आहे, तर सर्वात जास्त माता मृत्यूदर असलेले राज्य आसाम आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगाल, हरियाणा, उत्तराखंड आणि छत्तीसगड यांसारख्या राज्यांमध्ये मागील सर्वेक्षणाच्या तुलनेत माता मृत्युदरात वाढ नोंदवली गेली आहे.
प्रसूतीनंतर मातेला पुरेसा आराम, पौष्टिक आहार, स्तनपानाविषयी मार्गदर्शन आणि नियमित वैद्यकीय तपासणी यांनाही तितकेच महत्त्व आहे. शासनाच्या विविध योजनांद्वारे गर्भवती महिलांना मोफत तपासणी, औषधे, लसीकरण आणि सुरक्षित प्रसूतीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मात्र, या योजनांचा लाभ प्रत्येक गरजू महिलेला मिळण्यासाठी जनजागृती आणि समाजाचा सक्रिय सहभाग तेवढाच आवश्यक आहे.
भारत सरकारची ‘प्रधानमंत्री मातृवंदना’ या योजनेद्वारे गरोदर महिलांना पहिल्या अपत्यासाठी आर्थिक लाभ दिला जातो. तसेच ‘जननी सुरक्षा’ योजनेमार्फत गरोदर महिलांना प्रसूतीसाठी आर्थिक मदत पुरवली जाते. ‘जननी शिशू सुरक्षा’ कार्यक्रमाअंतर्गत शासकीय रुग्णालयांमध्ये गरोदर माता आणि बालकांना संपूर्ण मोफत उपचार, औषधे आणि वाहतूक सुविधा पुरवली जाते. तर ‘प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व’ अभियानामार्फत गरोदरपणाच्या दुसर्या आणि तिसर्या त्रैमासिकात महिलांची मोफत आरोग्य तपासणी आणि जोखीमेचे व्यवस्थापन केले जाते.
प्रत्येक गावातील सरकारी दवाखान्यातील कर्मचारी किंवा अंगणवाडीच्या आशाताईंकडून या योजनांची माहिती गर्भवती स्त्रीयांपर्यंत पाहोचवणे आणि या योजनांचा लाभ मिळवून देणे हे प्राधान्याने व्हायला पाहिजे. लोकसंख्या वाढीचा आणि मातांच्या आरोग्याचा जवळचा संबंध असल्यामुळे, मातांना सुरक्षितता आणि प्रसूतीनंतर दोन अपत्यांमध्ये योग्य अंतर राखण्याबाबत जागरूक करण्यासाठी, लोकसंख्या दिनाच्या आदल्या दिवशी म्हणजे 10 जुलैला ‘मातृ सुरक्षा दिन’ निवडण्यात आला आहे.
तसेच देशभरामध्ये दरवर्षी 11 एप्रिल रोजी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस (National Safe Motherhood Day) साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने गर्भवती आणि स्तनदा मातांच्या आरोग्याची योग्य पद्धतीने देखभाल करणे का गरजेचे आहे? याबाबत जगजागृती केली जाते. दोन मुलांमध्ये जर सुरक्षित अंतर राहिले नाही, तर मातेचे व पर्यायाने बालकाचेही आरोग्य धोक्यात येते. वारंवार धूप होऊन कस कमी होत जाणार्या जमिनीसारखी मातेची अवस्था होईल.ज्यामुळे तिचं मातृत्व हे ‘लाभलेलं’ न होता ‘लादलेलं’ होईल.
जर दोन मुलांमधला ‘पाळणा लांबवला नाही’ तर ‘जगाच्या उद्धारासाठी’ तिच्या हाती असलेल्या ‘पाळण्याच्या दोरी’चा तिच्याच ‘गळ्याभोवती फास’ होऊन बसेल. ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये आरोग्य सेवांबाबत जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज असून, मातृसुरक्षा दिन साजरा करणे हा केवळ एक औपचारिक दिवस नसून सुरक्षित मातृत्वाचा संकल्प दृढ करण्याची संधी आहे.






