विविधा : बासू चॅटर्जी

– माधव विद्वांस
भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक आणि पटकथा लेखक, चित्रकार बासू चॅटर्जी यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म 10 जानेवारी 1927 रोजी अजमेर, राजस्थान येथे एका बंगाली कुटुंबात झाला. ते आजीविकेसाठी मुंबईला आले. रुसी करंजिया यांच्या साप्ताहिक टॅब्लॉइड ब्लिट्झसाठी चित्रकार आणि व्यंगचित्रकार म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली. 1966 मध्ये गीतकार शैलेंद्र निर्मित राज कपूर आणि वहिदा रहमान यांची भूमिका असलेला ‘तीसरी कसम’ या चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले आणि चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
त्यांचे चित्रपट अनेकदा शहरी वातावरणातील मध्यमवर्गीय कुटुंबांच्या हलक्याफुलक्या कथांवर, वैवाहिक आणि प्रेमसंबंधांवर आधारित असायचे. वर्ष 1972 मधील ‘पिया का घर’ हा सिनेमाही लोकप्रिय झाला होता. हा चित्रपट राजा ठाकूर यांच्या ‘मुंबईचा जावई’ या मराठी चित्रपटाचा रिमेक आहे. यामध्ये भारतातील सर्वात मोठ्या शहरातील जीवनातील अडचणी विनोदी शैलीने चित्रित केल्या आहेत.
याचे लेखन व दिग्दर्शन बासू चॅटर्जी यांनी केले होते. ‘छोटी सी बात’ हा वर्ष 1975 मधील हिंदी भाषेतील विनोदी प्रेमकथा चित्रपट. याचे दिग्दर्शन बासू चॅटर्जी यांनी केले होते आणि यात अमोल पालेकर आणि विद्या सिन्हा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट यशस्वी झाला. धर्मेंद्र, हेमा मालिनी, अमिताभ बच्चन आणि अशोक कुमार यांच्या भूमिकाही होत्या.
चटर्जी यांनी बंगाली भाषेतील फारसे चित्रपट केले नाहीत. पण वर्ष 1998 मधे एक बंगाली भाषेतील चित्रपट दिग्दर्शित केला, ज्यात बांगलादेश आणि भारत या दोन्ही देशांतील कलाकार होते. या चित्रपटात बांगलादेशमधील फिरदौस अहमद आणि पश्चिम बंगालच्या प्रियांका त्रिवेदी आणि श्रीलेखा मित्रा यांच्या भूमिका होत्या होत्या. वर्ष 1986 मधील ‘एक रुका हुआ फैसला’, वर्ष 1989 मधील ‘कमला की मौत’ यांसारखे काही चित्रपट सामाजिक आणि नैतिक समस्यांवर आधारित आहेत.
‘चमेली की शादी’ अनिल कपूर व अमृता सिंग यांच्या भूमिका असलेला भारतातील जातिव्यवस्थेवरील विनोदी चित्रपट वर्ष 1986 मध्ये चॅटर्जींनी दिग्दर्शित केला. प्रियतमा, चक्रव्यूह (1978), जीना यहाँ (1979), बातों बातों में (1979), अपने पराये (1980) असे अनेक चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. इतर चित्रपटांमध्ये रत्नदीप, सफेद झूठ, मनपसंद, हमारी बहू अलका आणि त्रिचरित्र यांचा समावेश आहे.
चॅटर्जी यांनी दूरदर्शनसाठी ‘ब्योमकेश बक्षी’ आणि ‘रजनी’ या लोकप्रिय दूरचित्रवाणी मालिका दिग्दर्शित केल्या. प्रिया तेंडुलकरची मध्यवर्ती भूमिका असलेली ‘रजनी’ छोट्या पडद्यावरील मालिकेने तुफान लोकप्रियता मिळविली होती. दर्प, काकाजी कहे, भीम भवानी, एक प्रेम कथा या टीव्ही मालिकांचे दिग्दर्शन केले. आपल्या कारकिर्दीत सुमारे 40 चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले. 4 चित्रपटांची निर्मिती केली. 6 चित्रपटांचे संवाद लेखन केले.
फेब्रुवारी 2011 मध्ये मुंबईतील काला घोडा आर्ट फेस्टिव्हलमध्येे चॅटर्जी यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. लेखक आणि संगीत इतिहासकार अनिरुद्ध भट्टाचार्य यांनी लिहिलेले ‘बासू चॅटर्जी: अँड मिडल ऑफ द रोड सिनेमा’ नावाचे बासू चॅटर्जी यांच्या कार्यावरील पुस्तक 2023 मध्ये पेंग्विन रँडम हाउसने प्रकाशित केले आहे. 4 जून 2020 रोजी त्यांचे निधन झाले.





