Tulip Garden : जगप्रसिद्ध ट्युलिप उद्यान पर्यटकांसाठी खुले; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांच्या हस्ते पार पडले उदघाटन
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सोमवारी श्रीनगरमधील जगप्रसिद्ध इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डनचे (Tulip Garden) उद्घाटन केले.

Tulip Garden : जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सोमवारी श्रीनगरमधील जगप्रसिद्ध इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डनचे (Tulip Garden) उद्घाटन केले. दाल सरोवराच्या काठावर वसलेले हे आशियातील सर्वात मोठे उद्यान (Tulip Garden) असून, गेल्या वर्षीच्या सुरक्षा आव्हानांनंतर ते पुन्हा पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, पर्यटन उद्योगासाठी ही एक नवी सुरुवात आहे. यंदा १८ लाखांहून अधिक ट्युलिपच्या कंदांची लागवड करण्यात आली असून, ७० हून अधिक प्रजातींची फुले पर्यटकांचे आकर्षण ठरतील. विशेष म्हणजे, यंदा फेब्रुवारीतील वाढत्या तापमानामुळे फुले लवकर उमलली, परिणामी नियोजित वेळेच्या १० दिवस आधीच उद्यान खुले करण्यात आले.
अब्दुल्ला यांनी फुलांच्या शेतीला व्यावसायिक स्वरूप देण्यावर भर दिला. नेदरलँड्समधून कंद आयात करण्याऐवजी ते स्थानिक पातळीवर विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे परकीय चलनाची बचत होईल. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सर्व स्थळांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, पहिल्याच दिवशी पर्यटक आणि स्थानिकांनी उद्यानाबाहेर (Tulip Garden) मोठी गर्दी केली होती.






