Women lawyers’ chambers : “वकील चेंबर्समध्ये एक तृतीयांश ज्युनियर महिला असाव्यात”; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे आवाहन
वकील व्यवसायात महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी ज्येष्ठ वकिलांनी त्यांच्या चेंबर्समध्ये किमान एक तृतीयांश ज्युनियर वकील या महिला असाव्यात याची खात्री करावी.

Women lawyers’ chambers – वकील व्यवसायात महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी ज्येष्ठ वकिलांनी त्यांच्या चेंबर्समध्ये किमान एक तृतीयांश ज्युनियर वकील या महिला असाव्यात याची खात्री करावी, असे आवाहन भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी केले आहे. सिरी फोर्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे आयोजित पहिल्या श्रीमती शशी प्रभा सिंह स्मृती पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
पॅनेल वकील म्हणूनही अधिक महिलांची नियुक्ती करण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली. ज्येष्ठ वकील आणि सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष विकास सिंह यांच्या दिवंगत मातोश्रींच्या स्मरणार्थ हे पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये चार तरुण महिला वकिलांना आर्थिक मदतीसह सन्मानित करण्यात आले.
यामध्ये मोनिका धीमान यांना न्याय प्रभा रत्न, हुमा अंजुम आणि प्रियांशी कुमारी यांना संयुक्तपणे न्याय प्रभा गौरव, तर कवाना राव यांना न्याय प्रभा सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत सीजेआय इलेव्हन आणि सुप्रीम कोर्ट मीडिया इलेव्हन यांच्यात मैत्रीपूर्ण क्रिकेट सामनाही खेळवण्यात आला.
विश्वचषक विजेते माजी कर्णधार कपिल देव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, त्यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन आणि विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. या सामन्यात न्यायमूर्ती सौरभ बॅनर्जी सामनावीर आणि सर्वोत्तम फलंदाज ठरले, तर मीडिया संघाच्या सुमित आणि शाश्वत यांना अनुक्रमे सर्वोत्तम गोलंदाज व क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार मिळाला.
समारोप समारंभाला माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई, सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.






