Nitin Gadkari : महाराष्ट्रासाठी 1.50 लाख कोटींच्या रस्ते कामांस मंजुरी; मंत्री नितीन गडकरींनी दिली माहिती

नागपूर : महाराष्ट्रासाठी २०२६ पर्यंत १.५० लाख कोटी रुपयांच्या रस्ते कामांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहीती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ही कामे पुढील तीन महिन्यांत सुरू होतील, असे त्यांनी विधान भवनाच्या परिसरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. मंत्री गडकरी हे विधान परिषदेच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी विधिमंडळात आले होते.
गडकरी म्हणाले, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ १६,३१८ कोटी रुपये खर्चून पुणे-छत्रपती संभाजीनगर नवीन द्रुतगती मार्ग बांधणार असून, त्यासाठी सामंजस्य करारावर प्रक्रिया करण्यात आली आहे. या नवीन द्रुतगती मार्गामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर प्रवासाचा वेळ दोन तासांपर्यंत आणि छत्रपती संभाजीनगर ते नागपूर प्रवासाचा वेळ अडीच तासांपर्यंत कमी होईल.
४,२०७ कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर उन्नत मार्गाचे भूमिपूजन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर केले जाईल. हडपसर-यवत उन्नत मार्गासाठी डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि निवडणुकांनंतर कामाला सुरुवात होईल. पुणे विभागासाठी ५०,००० कोटी रुपयांच्या रस्ते कामांना मंजुरी देण्यात आली असून, पुढील तीन महिन्यांत बांधकाम सुरू होईल.
सध्याच्या पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाला समांतर असा १५,००० कोटी रुपये अंदाजित बांधकाम खर्चाचा नवीन द्रुतगती मार्ग दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ दीड तासांपर्यंत कमी करेल. मुंबई-पुणे-बंगळूर प्रवासाचा वेळ साडेपाच तास होईल. हे काम २०२६ मध्ये सुरू होईल. या प्रकल्पांपैकी ५०,००० कोटी रुपयांचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आल्याचे गडकरींनी सांगितले.





