Prashant Kishor : ‘भाजपमध्ये जेडीयू विलीन करण्याच्या हालचाली’; प्रशांत किशोर यांचा दावा
भाजपचे एजंट असणाऱ्या नेत्यांकडून जेडीयू चालवला जात आहे. ते विलिनीकरणाचा मार्ग मोकळा करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

Prashant Kishor – बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयूचे विलिनीकरण भाजपमध्ये करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे नितीश यांना सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर ठेवले जात आहे, असा सनसनाटी दावा जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी रविवारी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बिहारचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी नितीश सेतूचे लोकार्पण केले. मात्र, त्या कार्यक्रमावेळी नितीश उपस्थित नव्हते. त्याविषयीचा प्रश्न पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीवेळी किशोर यांना विचारण्यात आला.
उत्तरादाखल ते म्हणाले, संबंधित प्रश्न खरेतर जेडीयूच्या नेत्यांना विचारायला हवा. नितीश यांनी विमानतळावर मोदींचे स्वागत केले. मात्र, ते कार्यक्रमावेळी उपस्थित नव्हते. त्याविषयी जेडीयूच्या नेत्यांकडे विचारणा व्हायला हवी.
भाजपचे एजंट असणाऱ्या नेत्यांकडून जेडीयू चालवला जात आहे. ते विलिनीकरणाचा मार्ग मोकळा करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. संबंधित नेते नितीश यांना जनतेच्या नजरेपासून दूर ठेवण्याची निश्चिती करत आहेत, असे ते म्हणाले.
मात्र, बिहारमधील सत्ताधारी एनडीएच्या गोटातून नितीश यांना कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आल्याचा आरोप फेटाळण्यात आला. नितीश आता कुठल्या घटनात्मक पदावर नाहीत.
सरकारी कार्यक्रम असल्याने त्यांना निमंत्रण देण्याचा प्रश्न नव्हता, असे एनडीएमधील सुत्रांनी म्हटले. नितीश यांचे मंत्रिपुत्र निशांत आणि जेडीयूचे इतर अनेक नेते कार्यक्रमावेळी उपस्थित होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
नितीश काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले. त्यानंतर बिहारमधील एनडीए सरकारची सुत्रे भाजपकडे गेली. त्या पक्षाचे नेते सम्राट चौधरी मुख्यमंत्री बनले. एनडीएमध्ये भाजप, जेडीयू आणि इतर पक्षांचा समावेश आहे.
बिहार सरकारची सुत्रे भाजपकडे गेल्यापासून नितीश यांना बाजूला सारले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मोदींच्या बिहार दौऱ्यानंतर तो आरोप विरोधकांनी लावून धरला आहे.






