Chandrayaan-5 : चांद्रयान-५ साठी जपानसोबत सहकार्य; तामिळनाडूत उभारणार लहान उपग्रह प्रक्षेपण केंद्र
या मोहिमेत ३५० किलोग्रॅम वजनाच्या रोव्हरचा समावेश करण्याची योजना आहे. हा रोव्हर १०० दिवस चंद्राच्या पृष्ठभागावर प्रयोग करेल. इस्त्रोच्या प्रमुखांनी भविष्यातील योजनांची रूपरेषा सांगताना या मोहिमेबद्दलही माहिती दिली.

Chandrayaan-5 – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष व्ही. नारायणन म्हणाले की, चांद्रयान-५ मध्ये भारत आणि जपानच्या अंतराळ संस्थांच्या सहकार्याने राबवली जाणारी चंद्रावरील मोहीम असेल.
या मोहिमेत ३५० किलोग्रॅम वजनाच्या रोव्हरचा समावेश करण्याची योजना आहे. हा रोव्हर १०० दिवस चंद्राच्या पृष्ठभागावर प्रयोग करेल. इस्त्रोच्या प्रमुखांनी भविष्यातील योजनांची रूपरेषा सांगताना या मोहिमेबद्दलही माहिती दिली.
शनिवारी चेन्नईतील एका खाजगी विद्यापीठात आयोजित दीक्षांत समारंभात नारायणन यांनी इस्रोच्या भविष्यातील योजनांची रूपरेषा मांडली. त्यावेळी नारायणन म्हणाले की, भारत २०२९ पर्यंत आपल्या अंतराळ कार्याचा लक्षणीय विस्तार करेल.
यामुळे देशात चार सक्रिय प्रक्षेपण पॅड असतील. वाढती देशांतर्गत आणि जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी अंतराळ क्षेत्रातील खाजगी कंपन्यांसोबतची भागीदारी देखील वाढवली जाईल. अंतराळात हजारो उपग्रह प्रक्षेपित करण्याची वाढती गरज पूर्ण करण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे.
तामिळनाडूच्या तुतीकोरीन जिल्ह्यातील कुलसेकरपट्टिनम येथे २,००० एकर जागेवर स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेईकलसाठी एक समर्पित संकुल विकसित केले जाईल. जागतिक स्तरावर उपग्रह प्रक्षेपणाची वाढती मागणी पूर्ण करणे हा याचा उद्देश आहे.
इस्रोचे खासगीकरण केले जाणार नाही. तथापि, अंतराळ क्षेत्रातील वेगाने वाढणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी खाजगी कंपन्यांसोबत सहकार्य करणे गरजेचे ठरेल.
अंतराळातील वाढत्या परिसंस्थेला हाताळण्यासाठी इस्रो स्टार्टअप्स आणि खाजगी कंपन्यांना पाठिंबा देईल. त्यांना तांत्रिक कौशल्य पुरवले जाईल, ज्यामुळे आर्थिक वाढीला चालना मिळेल आणि हजारो उच्च-तंत्रज्ञानाच्या नोकऱ्या निर्माण होतील.
भारत २०२९ पर्यंत चार सक्रिय प्रक्षेपण तळांसह आपल्या अंतराळ कार्याचा विस्तार करेल. व्यावसायिक मोहिमा हाताळण्यासाठी खाजगी उद्योगांसोबतच्या भागीदारीवरही अधिक अवलंबून राहील.
कुलसेकरपट्टिनम येथे उभारण्यात येणाऱ्या अवकाश केंद्रामध्ये रॉकेट आणि उपग्रह एकत्रीकरण इमारती, प्रक्षेपण पॅड, रेल ट्रॅक प्रणाली, आणि टेलिमेट्री, ट्रॅकिंग व कमांड सुविधांचा समावेश असेल.





