Election Commission : व्हॉट्सॲपवर मतदारांची कागदपत्रे स्वीकारा.! राज्य निवडणूक आयोगाच्या बीएलओंना सूचना
पाठवलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी गरज असल्यास बीएलओंना घरांना भेट देण्यास सांगण्यात आले आहे.

Election Commission – राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना विशेष सखोल पडताळणी (एसआयआर) प्रक्रियेदरम्यान व्हॉट्सॲपद्वारे पाठवलेली मतदारांची कागदपत्रे विचारात घेण्यास सांगितले आहे. तसेच, गरज भासल्यास पडताळणीसाठी संबंधित घरांना भेट देण्याचे निर्देश बूथ लेव्हल ऑफिसर्सना (बीएलओ) दिले आहेत.
आयोगातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, लोक ईसीआय-नेट सॉफ्टवेअरद्वारे जारी केलेल्या नोटिसेसना प्रतिसाद म्हणून आवश्यक कागदपत्रे बीएलओंना व्हॉट्सॲपवर पाठवू शकतात. पाठवलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी गरज असल्यास बीएलओंना घरांना भेट देण्यास सांगण्यात आले आहे.
चोकलिंगम यांनी निवडणूक आयोगाकडे ईसीआय-नेट सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) मतदार यादीतील विसंगतींबाबत स्वतःच्या विवेकाचा वापर करू शकतील. मात्र, काँग्रेसने आरोप केला आहे की, ईसीआयनेट प्रणालीद्वारे मतदारांच्या पात्रतेबाबत निर्णय घेण्याचे ईआरओचे वैधानिक अधिकार कमकुवत केले जात आहेत.
महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पडताळणीसाठी दावे आणि हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबरवरून १२ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. नोटिस तसेच दावे आणि हरकती निकाली काढण्याचा कालावधी १० नोव्हेंबरपर्यंत आहे आणि अंतिम यादीच्या प्रकाशनाची तारीख १६ नोव्हेंबर आहे.





