पुणे : शहरातील विकासकामांच्या नावाखाली भाजपकडून सुरू असलेल्या बॅनरबाजीला प्रत्युत्तर म्हणून शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सोशल मिडीयाच्या माध्यमातून चक्क ” विकासाची पोलखोल स्पर्धा’ आयोजित केली आहे. या अंतर्गत शहरातील पायाभूत सुविधांसह, कचरा, रस्ते, सांडपाणी, वाहतूक समस्या सेल्फी अथवा व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मिडीयावर टाकणाऱ्यांसाठी ही स्पर्धा असणार आहे. त्यासाठी सेल्फी आणि व्हिडीओच्या विजेत्या स्पर्धकांना प्रत्येका 11 हजार 101 रूपयाचे बक्षिस पक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. येत्या 17 ते 26 ऑगस्ट या कालावधीसाठी ही स्पर्धा घेतली जाणार असून त्यासाठी राष्ट्रवादीकडून पोलखोलपुणे या हॅशटॅगचा वापर करून फेसबुक, ट्विटर तसेच इन्स्टाग्रामवर सेल्फी आणि व्हिडीओ पाठविण्याचे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे. गेल्या साडेचार वर्षात शहरातील पायाभूत सुविधांची वाताहत झाली असून भाजपकडून मोठया प्रमाणात पुणेकरांची दिशाभूल करणारी फ्लेक्सबाजी सुरू आहे. भाजपचा हा फोलपणा उघड करण्यासाठीच ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून नागरिकच भाजपला त्यांचा विकास दाखवून देतील. या साठीच ही स्पर्धा घेतली असल्याचे शहराध्यक्ष जगताप यांनी सांगितले.