Youth Congress : मुंबई युवक काँग्रेसचे मेटाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन
मुंबई युवक काँग्रेसने (Youth Congress) बीकेसी येथील मेटाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. भाजप आणि आरएसएसवर टीका करणाऱ्या आवाजांना दाबण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

Youth Congress : मुंबई युवक काँग्रेसने (Youth Congress) बीकेसी येथील मेटाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. भाजप आणि आरएसएसवर टीका करणाऱ्या आवाजांना दाबण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. हे आंदोलन मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली बीकेसी येथील वर्ल्ड वनमध्ये आयोजित करण्यात आले होते.
यावेळी आंदोलकांनी माहिती आणि प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे पोस्टरही जाळले. मेटा भाजपला अनुकूल असल्याचा आरोप करत घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांनी, इंडियन युथ काँग्रेसचे (Youth Congress) राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब आणि राष्ट्रीय प्रभारी मनीष शर्मा यांची खाती निलंबित करणे हा सोशल मीडियावरील असंतुष्ट आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केला.
प्रत्येक नागरिकाला सरकारला प्रश्न विचारण्याचा आणि आपली मते व्यक्त करण्याचा लोकशाही हक्क आहे. सोशल मीडिया खाती निलंबित करून हा हक्क हिरावून घेण्याचे असे प्रयत्न सहन केले जाणार नाहीत, असे शबरीन म्हणाल्या.
लोकशाही आवाज दाबण्याच्या प्रयत्नांविरोधात युवक काँग्रेस आपले आंदोलन सुरूच ठेवेल, असे शबरीन म्हणाल्या. या आंदोलनात पवन मजीठिया, अमनदीप सैनी यांच्यासह मुंबई युवक काँग्रेसचे (Youth Congress) पदाधिकारी आणि जिल्हा व विधानसभा स्तरावरील पदाधिकारी सहभागी झाले होते.






