Weather Update : हिवाळा असतानाच देशाच्या अनेक भागात हवामानाचा मोठा बदल होत आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) पुढील ४८ तास अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगितले असून, ६, ७ आणि ८ डिसेंबर रोजी अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर भारतात सध्या तीव्र थंडी आणि धुके यांचा प्रभाव दिसत आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात किमान तापमानात लक्षणीय घट होत असून काही भागांत थंडीची लाट (cold wave) सुरू आहे. राजस्थानच्या शेखावाटी भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सकाळी दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी होत असल्याने वाहतूकही प्रभावित होत आहे. दुसरीकडे, दक्षिण आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये मात्र अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी-कराईकल, रायलसीमा, यानम आणि माहे या भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये पाऊस आणि उच्च हिमालयीन भागांत बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात सध्या हवामान तुलनेने कोरडे आणि थंड आहे, मात्र पुढील ३-४ दिवसांत वाऱ्याच्या दिशेत बदल झाल्याने तापमानात आणखी घट होण्याची आणि काही भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे. IMD ने नागरिकांना सतर्क राहण्याचे, गरम कपडे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः डोंगराळ भागांत बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद होण्याची आणि मैदानी भागांत धुक्यामुळे अपघाताची शक्यता आहे.