Indurikar Maharaj : 100 एकर जागेत आलिशान मंडप, दिग्गजांसह लाखभर लोकांना निमंत्रण..; इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाहाची राज्यभरात चर्चा !
कीर्तनातून साधेपणाचा संदेश देणाऱ्या इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा हा आलिशान विवाह सोहळा सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे.

Indurikar Maharaj : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे रविवारी एका भव्य आणि चर्चेतील लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा शाही सोहळा कोणत्याही राजकीय नेत्याचा किंवा मोठ्या उद्योगपतीचा नसून, आपल्या खास शैलीतील कीर्तनांमुळे प्रसिद्ध असलेल्या निवृत्त महाराज देशमुख उर्फ ‘इंदोरीकर महाराज‘ यांच्या मुलीचा आहे.
इंदोरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा विवाह उद्योजक सुनील विष्णू चिलप यांचा मुलगा साहिल याच्याशी होत आहे. हा विवाह सोहळा रविवारी सायंकाळी सुमारे 6.50 वाजता पार पडणार असून, त्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार तयारी सुरू आहे. (Indurikar Maharaj )
या सोहळ्याची खास बाब म्हणजे तब्बल शंभर एकर परिसरात उभारण्यात आलेला भव्य मंडप आणि करण्यात आलेली आलिशान व्यवस्था. संपूर्ण परिसर सजवण्यात आला असून, पाहुण्यांसाठी जेवणावळीची मोठी व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमात कीर्तनपुष्प, धार्मिक विधी आणि त्यानंतर मुख्य विवाह सोहळा अशा टप्प्यांमध्ये कार्यक्रम पार पडणार आहे. याच निमित्ताने गगनगिरी महाराज सप्ताहाच्या ध्वजारोहणाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. (Indurikar Maharaj)
या शाही लग्नासाठी राज्यातील अनेक मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आजी-माजी मंत्री, आमदार, खासदार तसेच विविध क्षेत्रातील उद्योजक आणि कीर्तनकारांची मोठी उपस्थिती अपेक्षित आहे. त्यामुळे हा विवाह सोहळा केवळ कौटुंबिक कार्यक्रम न राहता एक मोठा सामाजिक आणि धार्मिक सोहळा ठरत आहे.
दरम्यान, या विवाह सोहळ्याची चर्चा होण्यामागे आणखी एक कारण म्हणजे इंदोरीकर महाराजांचे कीर्तनातील विचार. आपल्या प्रवचनांमध्ये ते नेहमी साधेपणाने लग्न करण्याचा सल्ला देत आले आहेत. “लग्नात अनावश्यक खर्च टाळा, साधेपणाने सोहळा करा,” असे ते वारंवार सांगतात. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्यांच्या मुलीचा साखरपुडा देखील मोठ्या थाटामाटात पार पडला होता, ज्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका झाली होती. Indurikar Maharaj
त्या टीकेला उत्तर देताना इंदोरीकर महाराजांनी स्पष्ट भूमिका मांडली होती. “लग्न आणखी जोरात करणार,” असे ठामपणे सांगत त्यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले होते. आता प्रत्यक्ष लग्नसोहळाही तितक्याच भव्य पद्धतीने पार पडत असल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
एकूणच, कीर्तनातून साधेपणाचा संदेश देणाऱ्या इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा हा आलिशान विवाह सोहळा सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत असून, धार्मिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.






