Solapur Dowry Case : सोलापूरात हुंडाबळीचा धक्कादायक प्रकार उघडकीस; सासरच्या त्रासाला, छळाला कंटाळून विवाहितेने संपवले जीवन
मृत विवाहितेला दुचाकी आणि सोन्याच्या अंगठीसाठी सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे.

Solapur Dowry Case – स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारत असलो, तरी हुंड्यापाई हजारो निष्पाप तरुणींचा छळ केला जातो आणि शेवटी त्यांचे आयुष्य संपवलं जातं. महाराष्ट्रातून देखील अशा अनेक घटना समोर येत असतात. सोलापूरमध्ये हुंडाबळीचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
सासरच्या मंडळींकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या त्रासाला आणि छळाला कंटाळून एका विवाहितेने आपले जीवन संपवल्याचे समोर आले आहे. या गंभीर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वरी रोहित जाधव असे मृत महिलेचे नाव आहे.
विवाहितेच्या पतीसह सासू, सासरे आणि नणंद यांच्या विरोधात हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत विवाहितेला दुचाकी आणि सोन्याच्या अंगठीसाठी सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे.
महत्त्वाचे म्हणजे विवाहितेने पोलिसात सासरच्यांविरोधात पोलिसात तक्रार केल्यानंतर ४० मिनिटात तिच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तक्रार दाखल केल्यानंतर काही वेळातच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ज्ञानेश्वरीला गेल्या दोन वर्षापासून सासरच्या मंडळीकडून सातत्याने त्रास दिला जात होता. पुण्यातील वानवडीच्या केदारी नगर परिसरात त्रास देण्यात आला. सदर बझार पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली होती.
ज्ञानेश्वरीने दिलेल्या तक्रारीनुसार तिचा पती रोहित, सासरे विलास, सासू जयश्री आणि नणंद अश्विनी हे चौघेही तिच्याकडे माहेरून दुचाकी आणि सोन्याची अंगठी आणण्याची मागणी करत होते.
ही मागणी पूर्ण न झाल्याने तिला वारंवार शिवीगाळ केली जात होती. तसेच दमदाटी करून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप तिने केला आहे.






