Sachin Vaze Bail : सचिन वाझे यांचा जामीन रद्द.! अँटिलिया प्रकरणात उच्च न्यायालयाकडून दणका
मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या अँटिलियाजवळ स्फोटकांनी भरलेली एक एसयूव्ही कार २५ फेब्रुवारी २०२१ रोजी आढळली होती.

Sachin Vaze Bail – अँटिलिया बॉम्ब धमकी प्रकरणातील आरोपी आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना मंजूर करण्यात आलेला जामीन मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केला. त्यामुळे पाच वर्षांपासून कारागृहात असलेल्या सचिन वाझे यांचा मुक्काम दिवाळीतही कारागृहातच राहणार आहे.
न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे. विशेष न्यायालयाने सचिन वाझे यांचा जामीन मंजूर केला होता, ज्याच्या विरोधात एनआयएने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी झालेल्या सुनावणीत तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेने अर्थात एनआयएने दाखल केलेले अपील न्यायालयाने मंजूर केले.
२०२१ च्या अँटिलिया बॉम्ब धमकी प्रकरणात आणि ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या वाझे यांना विशेष न्यायालयाने सप्टेंबर महिन्यात जामीन मंजूर केला होता. या आदेशाला तातडीने स्थगिती देण्याची विनंती एनआयएने उच्च न्यायालयात केली.
दरम्यान, मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या अँटिलियाजवळ स्फोटकांनी भरलेली एक एसयूव्ही कार २५ फेब्रुवारी २०२१ रोजी आढळली होती. यानंतर या कारचे मालक असलेले व्यावसायिक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ५ मार्च २०२१ रोजी ठाणे शहरातील एका खाडीत सापडला. तपास यंत्रणेचा आरोप आहे की, मुंबई गुन्हे शाखेत सहाय्यक पोलीस निरीक्षक असताना सचिन वाझे यांनीच कटाचा भाग म्हणून स्फोटकांनी भरलेली ती कार तिथे उभी केली होती.






